Sun, Mar 24, 2019 06:24होमपेज › Kolhapur › पालकमंत्र्यांकडून शिक्षण वाचवा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न

पालकमंत्र्यांकडून शिक्षण वाचवा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 13 2018 1:41AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या वतीने गेले दोन महिने सुरू असलेल्या जनआंदोलनाची तीव्रता लक्षात घेता राज्यभर आंदोलनाचे लोण पसरू नये, यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून कोल्हापूरचे शिक्षण वाचवा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी सोमवारी (दि.12) सायंकाळी पत्रकार परिषदेत केला. 

कृती समितीचे अशोक पोवार म्हणाले, रविवारी (दि.11) दुपारी पालकमंत्री पाटील यांचे नाव सांगून चार व्यक्‍ती माझ्या घरी आल्या. त्यांनी माझ्याशी फोनवर संपर्क साधत तुमचा पालकमंत्र्यांसमवेत संवाद घडवायचा आहे, लवकर घरी या, असा फोन केला. घरी आल्यानंतर त्यामधील एकाने मी दादांचा भाचा के. के. पाटील आहे, तुमच्या मागण्या काय आहेत ते सांगा अशी विचारणा केली. दर्जेदार शिक्षण द्या, कोणत्याही शाळा बंद करू नका, शिक्षणावर सहा टक्के खर्च करा, अशा मागण्या असल्याचे आपण त्यांना सांगितले.

दरम्यान, त्यामधील एका व्यक्‍तीने पालकमंत्र्यांशी फोन जोडून दिला. शिक्षण वाचविण्यासाठी आमचे सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू आहे. पालक विद्यार्थ्यांना घेऊन रस्त्यावर येणार असल्याचे मी पालकमंत्री पाटील यांना सांगितले. यावर पालकमंत्र्यांनी चढ्या भाषेत उत्तर देत हे चालू दिले जाणार नसल्याचे सांगितले. चर्चा करता येत नाही का? कोणताही विद्यार्थी रस्त्यावर येणार नाही, असा शिक्षणाधिकारी आदेश काढतील, अशा पद्धतीने उर्मट भाषेत पालकमंत्री बोलल्याचा आरोप शिक्षण वाचवा नागरी कृती समितीचे समन्वयक अशोक पोवार यांनी यावेळी केला. 

शिक्षण वाचवा कृती समितीच्या वतीने राजर्षी शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी केलेला मोफत व सक्‍तीच्या शिक्षणाधिकार कायदा अखंडपणे सुरू ठेवण्याच्या मागणीसाठी शहरातील सर्वच शाळांमधील विद्यार्थी पालकांसमवेत मंगळवारी शाळा सुटल्यानंतर 11.30 वाजता शाळेच्या समोरील रस्त्यावर सामुदायिक परिपाठ (प्रार्थना) म्हणून शासनाला जाग आणणार आहेत. शिक्षण वाचवा कृती समितीच्या पदाधिकार्‍यांना पोलिसांनी 149 ची नोटी बजावली आहे. 

दरम्यान, ना. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या स्वीय सहायकांनी विधानभवनात बैठक सुरू आहे. थोड्या वेळानंतर बोलणे करून देतो, असे सांगितले. यावेळी कृती समितीचे भरत रसाळे, राजेश वरक, वसंतराव मुळीक, गणी आजरेकर, सुभाष देसाई, लालासाहेब गायकवाड, किशोर घाटगे,  उपस्थित होते.