Mon, May 20, 2019 08:00होमपेज › Kolhapur › चराटींचा काँग्रेस-राष्ट्रवादी-सेनेला ‘दे धक्‍का’

चराटींचा काँग्रेस-राष्ट्रवादी-सेनेला ‘दे धक्‍का’

Published On: Apr 13 2018 1:17AM | Last Updated: Apr 12 2018 10:41PMआजरा : ज्योतिप्रसाद सावंत

आजरा नगरपंचायत निवडणुकीमध्ये काही मोजक्या शिलेदारांच्या साथीने आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांनी विजयश्री अक्षरशः खेचून आणली असून, ताराराणी आघाडी पुरस्कृत शहर विकास आघाडीचे तब्बल 9 उमेदवार निवडून आणत  विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. नेतेमंडळींच्या हेकेखोरपणामुळे राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना आघाडीला पोषक वातावरण असूनही बॅकफुटवर जावे लागले आहे. ज्योत्स्ना चराटी यांच्या नगराध्यक्षा निवडीने स्व. काशीनाथअण्णा चराटी यांच्या तिसर्‍या पिढीने राजकारणात दमदार एंट्री केली आहे.

आजरा ग्रामपंचायत म्हणजे स्व. काशीनाथअण्णा चराटी असे समीकरण गेल्या 40 वर्षांपासून आजरा शहरवासीय अनुभवत आहेत. एखादा अपवाद वगळता चराटी गटाचे ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. आता पुन्हा नगरपंचायत झाल्यानंतर पहिली नगराध्यक्षा होण्याचा मान ज्योत्स्ना चराटी यांनी मिळविला आहे. नगरपंचायत मंजुरी मिळविण्यामध्ये अशोकअण्णा चराटी यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर झाल्यापासून चराटी यांना सहानुभूती राहिली होती. हा शहरवासीयांचा कल ओळखून राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांनी एकत्र येऊन त्यांच्यासमोर नेटके आव्हान उभे केले होते. आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, माजी आमदार के. पी. पाटील यांनी या आघाडीच्या बाजूने प्रचाराचे रान उठविले होते; परंतु ऐनवेळी तयार झालेल्या तिसर्‍या आघाडीचा अडथळा राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची आघाडी पार करू शकली नाही. अप्रत्यक्षरीत्या आमदार आबिटकर यांच्या परिवर्तन आघाडीचा चराटी यांच्या आघाडीलाच फायदा झाल्याचे निकालानंतर स्पष्टपणे जाणवले.

एकीकडे अशोकअण्णा चराटी, अरुण देसाई, सुधीर मुंज, विजयकुमार पाटील ही मंडळी आघाडीच्या विजयासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे काँग्रेस, सेनेच्या आघाडीने जिल्हा पातळीवरील नेत्यांच्या मदतीने हवा तयार केली होती. परिवर्तन विकास आघाडी बर्‍यापैकी मुसंडी मारेल, असे चित्र दिसत होते. शेवटच्या टप्प्यात मात्र परिवर्तन विकास आघाडी ढासळली. मात्र, या आघाडीचा अडथळा काँग्रेस, सेना आघाडीसमोर कायमच होता. अतिशय चांगल्या पद्धतीने आमदार सतेज पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांनी या आघाडीला मशागत करून दिली होती; परंतु या आघाडीची तयार झालेली हवा उमेदवारांच्या डोक्यातही शिरली आणि याचाच फटका या आघाडीला बसला. परिणामी निसटत्या मतांनी एक-दोन ठिकाणी जागा गमवाव्या लागल्या. या जागा सत्तेपासून राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना आघाडीला रोखण्यास कारणीभूत ठरल्या. 

नगरपंचायत निवडणुकीत अनेकांना नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले. रासपा, मनसे निष्प्रभ ठरले. 13 माजी ग्रामपंचायत सदस्यांना पराभव पत्करावा लागला. काँग्रेसचा हात प्रथमच प्रभावी ठरला. चारपैकी दोन जागांवर त्यांनी विजय मिळविला, तर दोन जागांवर निसटता पराभव पत्करावा लागला. शिवसेनेने आपले अस्तित्व राखण्यापर्यंत मजल मारली, तर राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जागांवर विजय मिळविला. काँग्रेस, सेना आघाडीतील अनेक नेतेमंडळींनी आपल्याच समर्थकांना उमेदवारी देण्याचा घातलेला घाट आघाडीच्या अंगलट आला. विजयाची क्षमता असणारे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात राहिले. याचा फटकाही या आघाडीला निश्‍चितच बसला आहे. या सर्व प्रकारात अशोकअण्णा चराटी व त्यांचे सहकारी उजवे ठरले आहेत. कोणतेही वरिष्ठ नेते प्रचारात नसतानाही त्यांनी आघाडीला मिळवून दिलेला विजय हा निश्‍चितच कौतुकास्पद आहे.

Tags : Kolhapur, Congress, shiv sena, NCP,  fall,  election