Thu, Apr 25, 2019 23:23होमपेज › Kolhapur › जनसंघर्ष यात्रेनिमित्त काँग्रेसची शहरात रॅली

जनसंघर्ष यात्रेनिमित्त काँग्रेसची शहरात रॅली

Published On: Sep 01 2018 1:46AM | Last Updated: Aug 31 2018 11:41PMकोल्हापूर : प्रतिनिधी

काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने शुक्रवारी (दि.31) शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. कावळा नाळा येथील रणरागिणी ताराराणी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीस सुरुवात झाली. 

वाहनांवर लावण्यात आलेले झेंडे, भाजप सरकारच्या विरोधात चाललेला एल्गार, काँग्रेस पक्षाच्या जय जयकाराच्या घोषणा यामुळे संपूर्ण मिरवणूक  मार्गावरील वातावरण काँग्रेसमय झाले होते.काँग्रेसच्या वतीने राज्यात काढण्यात येणार्‍या जनसंघर्ष यात्रेच्या प्रारंभाप्रसंगी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सकाळपासूनच कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन ताराराणी चौकात जमत होते. चौकाच्या चारही दिशेने झेंडेे हातात घेऊन कार्यकर्ते येत होते. आमदार सतेज पाटील हे देखील सकाळपासून ताराराणी चौकात उभे 
होते. 

दहा वाजण्याच्या सुमारास हा चौक पूर्ण भरला होता. साडेदहा वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्राचे प्रभारी खा. मल्लिकार्जुन खर्गे व प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यासह महाराष्ट्रातून आलेले सर्व नेते खासगी बसमधून ताराराणी चौकात आले. त्यांचे आमदार सतेज पाटील यांनी स्वागत केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी  करण्यात आली. सर्व नेत्यांनी रणरागिणी ताराराणी यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर सर्व नेते जनसंघर्ष यात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या खास रथामध्ये उभा राहिले. त्यानंतर रॅलीस सुरुवात झाली. रॅलीत धनगरी ढोलसारखे पारंपरिक वाद्य आणण्यात आले होते.

मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील वटेश्‍वर मंदिराजवळील राजीव गांधी यांच्या पुतळ्याजवळ रॅली थांबविण्यात आली. सर्व नेत्यांनी राजीव गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. तेथून स्टेशनरोेड मार्गे ही रॅली दसरा चौकामध्ये आली. याठिकाणी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर येथे मराठा समाज तसेच लिंगायत समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दर्शविला. 

तेथून सीपीआर चौक, भाऊसिंगजी रोड मार्गे भवानी मंडप येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. त्यानंतर सर्व नेते अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिरात गेले. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर भवानी मंडप येथे सर्व नेत्यांच्या उपस्थितीत संघर्ष ज्योत प्रज्वलीत करून जनसंघर्ष यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी महापौर सौ. शोभा बोंद्रे, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आ. सतेज पाटील, हर्षवर्धन पाटील, नसीम खान, मधुकर चव्हाण, डी. पी. सावंत, प्रकाश आवाडे, हुस्नबानू खलिपे, वीरेंद्र जगताप, रामहरी रूपनवर, सचिन सावंत, बसवराज पाटील, ऋतुराज पाटील, जयवंतराव आवळे आदी काँग्रेसचे नेते तसेच महापालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आदी उपस्थित होते.

लोकांच्या हक्काचे राज्य येऊ दे...
लोकांच्या हक्काचे व हिताचे राज्य येऊ दे... असे साकडे आई अंबाबाईला घालून काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी काँग्रेस बळकटीसाठी देवीच्या चरणी प्रार्थना केली. केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने काढण्यात येणार्‍या जनसंघर्ष यात्रेची आज कोल्हापुरातून सुरुवात झाली. आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन जनसंघर्ष यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. भवानी मंडपातील कुस्तीवीर कै. खाशाबा जाधव स्मृतिस्तंभापुढे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी संघर्ष यात्रेची मशाल पेटवली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, आ. सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.   अंबाबाई मंदिर व भवानी मंडप परिसरात सकाळपासूनच पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच जनसंघर्ष यात्रेची चर्चा या ठिकाणी नागरिकांत सुरू होती. दुपारी बाराच्या सुमारास धनगरी ढोलांच्या गजरात जनसंघर्ष यात्रा भवानी मंडपात दाखल झाली. यात्रेत सहभागी सर्व नेते येथून मंदिरात दाखल झाले. मंदिरात आलेल्या काँग्रेसच्या नेत्यांचे स्वागत देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केले. देवीचे दर्शन घेऊन परतलेल्या नेत्यांनी देवीच्या चरणी लोकांचे हक्काचे सरकार सत्तेवर येऊ दे, अशी प्रार्थना केल्याचे सांगितले. जनसंघर्ष यात्रेत यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार कुमार केतकर, आमदार नसीम खान, हर्षवर्धन पाटील, मधुकर चव्हाण, डी. पी. सावंत, आ. अ‍ॅड. हुस्नाबानू खलिफे, वीरेंद्र जगताप, रामहरी रूपनवार, सचिन सावंत, चारुलता टोकस, राजन भोसले, बसवराज पाटील, ऋतुराज पाटील, पृथ्वीराज साठे, प्रकाश सोनवणे, रामकृष्ण, यशवंत हप्पी, प्रकाश आवाडे, जयवंतराव आवळे, तौफिक मुल्लाणी, राजू वाघमारे, प्रकाश सातपुते, अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, सभागृह नेते दिलीप पवार, प्रवीण केसरकर, शारंगधर देशमुख, राहुल माने, संध्या घोटणे, वैशाली पाटील-महाडिक, चंदा बेलेकर, दीपा पाटील, पूजा आरडे, प्रा. अनुराधा मांढरे, रूपाली पाटील आदींची उपस्थिती होती..