होमपेज › Kolhapur › काँग्रेस जिल्हाध्यक्ष बदलाला तूर्तास ब्रेक?

काँग्रेस जिल्हाध्यक्ष बदलाला तूर्तास ब्रेक?

Published On: Jan 09 2018 1:33AM | Last Updated: Jan 08 2018 11:36PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : रणधीर पाटील

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने आता प्रदेश, जिल्हा व तालुकास्तरावरील पदाधिकार्‍यांना आणखी काही काळ अभय मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली जिल्हाध्यक्ष बदलाची चर्चा आता थंडावली आहे. 

गेल्या 18 ते 19 वर्षांपासून काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार पी. एन. पाटील कार्यरत आहेत. सध्या त्यांच्याकडे प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यभार आहे. पी. एन. पाटील व आवाडे गटाच्या कुरघोडीच्या राजकारणात कागलच्या माजी आमदार संजय घाटगे यांना एक दिवसाचे जिल्हाध्यक्षपद मिळाले होते. सध्या जिल्हाध्यक्षपद बदलाचे वारे वाहत होते. त्यात जिल्हाध्यक्षपदासाठी आ. सतेज पाटील, ‘घरवापसी’ करणार्‍या प्रकाश आवाडे यांच्या नावांची चर्चा होती. आता ही निवड प्रक्रियाच रेंगाळण्याची शक्यता आहे.  

राष्ट्रवादीची स्थापना; काँग्रेसला खिंडार

1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेसलाही खिंडार पडले होते. काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कुपेकर, शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्यासह बहुतांश पदाधिकारी राष्ट्रवादीत गेले होते. काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली होती. अशा स्थितीत पी. एन. पाटील यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी पडली होती. पाटील यांनीही राष्ट्रवादीचा झंझावात रोखण्याबरोबरच काँग्रेसची पाळेमुळे घट्ट रोवण्यासाठी नेटाने प्रयत्न केले. अल्पावधीत जिल्ह्यापासून तालुकास्तरापर्यंत पक्षाची मोट बांधली.  

जिल्हाध्यक्ष निवडीवरून राडा

2012 मध्ये जिल्हाध्यक्षपदासाठी माजी आमदार संजय घाटगे व माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यात मतदान झाले. त्यावेेळी पाटील यांच्या पाठिंब्यामुळे घाटगे यांनी आवाडेंना मात दिली होती. तणावात झालेल्या या निवडणुकीवेळी काँग्रेस कमिटीमध्येच पाटील-आवाडे गटात जोरदार राडा झाला होता. त्यामुळे प्रदेश पातळीवरून ही निवड प्रक्रियाच रद्द करण्यात आली होती. या घटनेनंतर पाटील व आवाडे गटात पक्षांतर्गत पातळीवर कधी छुपा, तर कधी उघड संघर्ष पाहायला मिळाला. संजय घाटगे यांचे जिल्हाध्यक्षपद अल्पजीवी ठरले. 

विधान परिषद निवडणुकीत आवाडे गटाला जिल्हाध्यक्षपदाचा ‘शब्द’

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. पी. एन. पाटील, सतेज पाटील, प्रकाश आवाडे अशा दिग्गजांना पराभवाचा फटका बसला. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे महादेवराव महाडिक, सतेज पाटील, पी. एन. पाटील व प्रकाश आवाडे असे चौघे इच्छुक होते. काँग्रेसची उमेदवारी सतेज पाटील यांना जाहीर झाल्यानंतर महाडिक यांनी बंडखोरी केली. पक्ष नेतृत्वाने समजूत काढल्यानंतर आवाडे यांनीही अर्ज मागे घेतला. त्यावेळी त्यांना प्रदेश पातळीवरून जिल्हाध्यक्षपद देण्याचा ‘शब्द’ दिला होता. तो ‘शब्द’ न पाळल्याचा आरोप करीत आवाडे गट काँग्रेसपासून दुरावत गेला. 

झेडपीत आवाडे गट भाजपसोबत

जिल्हा परिषद व पंचाय समिती निवडणुकीत आवाडे गटाने काँग्रेसशी फारकत घेत कोल्हापूर जिल्हा ताराराणी आघाडीच्या झेंड्याखाली निवडणूक लढवली. त्यात त्यांना दोन जागा मिळाल्या. या दोन जागाच जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेत भाजपला उपयोगी पडल्या. आतापर्यंत काँग्रेसचे निष्ठावंत असणारे आवाडे यांनी जिल्हा परिषदेत उघडपणे भाजपला पाठिंबा देत  पी. एन. पाटील यांच्या मुलाला जिल्हा परिषद अध्यक्ष होण्यापासून रोखले. 

राष्ट्रवादी, भाजपचा प्रवेशाला विरोध

स्थानिक आघाडीच्या माध्यमातून राजकारण केल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांत सत्तेचा अल्पसा वाटा मिळेल; पण आमदारकी आणि मंत्रिपद हवे असल्यास राजकीय पक्षाला पर्याय नसल्याचे आवाडे गट जाणून होता. त्यामुळे त्यांनी भाजप, तसेच राष्ट्रवादीचे पर्याय चाचपून बघितले; पण या दोन्ही ठिकाणी स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी आवाडेंच्या प्रवेशाला टोकाचा विरोध केला. त्यातून आवाडे गटाचा पक्ष प्रवेश लटकला. 

आवाडेची ‘घरवापसी’?

दोन दिवसांपूर्वी प्रकाश आवाडे यांनी नवी दिल्लीत प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या सोबत पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश यांची भेट घेतली. तत्पूर्वी, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूर दौर्‍यावर आलेल्या खा. चव्हाण यांच्या दौर्‍यादरम्यानही चव्हाण व आवाडे यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. आता नवी दिल्लीत मोहन प्रकाश यांची भेट घेतल्याने आवाडे पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रिय होतील, असे दिसते. तत्पूर्वी, काँग्रेसच्या अध्यक्षपदी खा. राहुल गांधी यांची निवड झाल्यानंतर माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी इचलकरंजी काँग्रेस कमिटीत मेळावा घेऊन राहुल गांधी यांचे हात बळकट करूया, असे सांगत काँग्रेसमध्ये सक्रिय असल्याचे दाखवून दिले होते. 

...तर आ. पाटील, आवाडे प्रमुख दावेदार

सध्या जिल्हाध्यक्षपदाचा प्रभारी कार्यभार पी. एन. पाटील यांच्याकडेच आहे. प्रदेशाध्यक्ष निवड प्रक्रिया तूर्त स्थगित केल्याने प्रदेश, जिल्हा, तसेच तालुकास्तरीय निवडींबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.  ज्यावेळी जिल्हाध्यक्ष बदलाची प्रक्रिया सुरू होईल, त्यावेळी आ. सतेज पाटील आणि प्रकाश आवाडे हेच प्रमुख दावेदार असणार आहेत. कारण, या तिघांशिवाय जिल्ह्याचे नेतृत्व करू शकेल, असा नेता सध्यातरी काँग्रेसकडे नाही.