Mon, Jun 17, 2019 04:14होमपेज › Kolhapur › इंधन दरवाढविरोधात काँग्रेस रस्त्यावर

इंधन दरवाढविरोधात काँग्रेस रस्त्यावर

Published On: Jan 31 2018 2:03AM | Last Updated: Jan 31 2018 12:54AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात मंगळवारी जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. इंधन दरवाढीचा निषेध म्हणून काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते बैलगाडी आणि  सायकलींवरून मोर्चात सहभागी झाले होते. दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. घोषणा देत, सरकारचा निषेध करत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश सुभेदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चात जुन्या सायकलींवर बसून युवक कार्यकर्ते, हातात गॅस सिलिंडरचे पोस्टर घेऊन, ‘मोदी सरकारचा धिक्‍कार असो, मोदी सरकार हाय हाय, पेट्रोल, डिझेल दरवाढ रद्द झालीच पाहिजे,’ अशा घोषणा देत होते. मोर्चा, व्हीनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर  आला. 

यावेळी झालेल्या सभेत पी. एन. पाटील  म्हणाले, पेट्रोल, डिझेलचे भाव भरमसाट वाढले आहेत. गुळाला हमीभाव मिळत नाही, दर घसरल्याने साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. या सर्वाला मोदी सरकार जबाबदार आहे. काँग्रेसने सत्तेच्या काळात क्रुड ऑईलच्या बॅरेलचा दर 120 डॉलर होता; पण त्यावेळी 65 रुपये लिटरच्यावर पेट्रोलचा दर गेला नव्हता.  सध्या क्रुड ऑईलचा बॅरेलचा दर 40 डॉलर असतानाही पेट्रोलचा दर 82 रुपयांवर गेला आहे. यामुळे सामान्य व्यक्‍ती आर्थिक अडचणीत सापडली आहे. यातच फडणवीस सरकारने गोरगरिबांच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.  सहकारी संस्था मोडीत काढल्या जात आहेत. नोटाबंदी केल्यामुळे बँका अडचणीत आल्या आहेत, असे सरकार यापुढे राहिले तर या देशाला अडचणीत आणल्याशिवाय राहणार नाही. यामुळे येत्या निवडणुकीत मोदी सरकारला हटविण्यासाठी तयारी लागा. 

पाटील म्हणाले, मुख्यमंत्री  फडणवीस म्हणतात, शेतकर्‍यांच्या मुलाने शेतीच करावी. याचा अर्थ शेतकर्‍यांच्या मुलांनी नोकर्‍या किंवा उद्योग करु नयेत, असे त्यांना वाटत असावे. यावरुन या सरकारचे धोरण काय असावे, हे लक्षात येते.

माजी मंत्री जयवंतराव आवळे म्हणाले, खोटे बोलून लोकांची दिशाभूल करणारे भाजप सरकार आहे. परदेशातून काळा पैसा आणतो, देशातील प्रत्येक व्यक्‍तीच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करतो, अशी खोटी आश्‍वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारला खाली खेचा.

इंधन दरवाढीचा महागाईवर परिणाम होत आहे. घरगुत्ती गॅसच्या किंमतींत प्रचंड वाढ झालेली असून एक वर्षात 19 वेळा गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. तसेच सबसिडीच्या नावाखाली जनतेची लूट सुरु आहे. सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागले असा इशारा देण्यात आला आहे.

ऊस, गूळ व इतर शेती मालाला हमी भाव द्या

राज्यात उसाचे 75 ते 80 टक्के उत्पादन घेतले जाते. या उसाला योग्य भाव मिळाला पाहिजे. शासनाने एफआरपीचा कायदा केला आहे. त्यामुळे चालू गळीत हंगामाच्या सुरवातीला साखरेचे दर प्रतिक्‍विंटल 3600 ते 3650 रुपये इतका दर होता. सध्या साखरेचे दर कमी झाले असून प्रतिक्‍विंटल सातशे ते आठशे रुपयांनी दर खाली आले आहेत. त्यामुळे एफआरपी एवढा दर देणे कारखान्यांना शक्य होत नाही. यासाठी साखर कारखान्यांना कर्ज घ्यावे लागणार आहे, अशा कर्जासाठी शासनाने हमी द्यावी. सोयाबीन, मका, भात, ज्वारी  व इतक कडधान्ये यांना हमी भाव देण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. 

यावेळी अ‍ॅड.सुरेश कुराडे, वैष्णवी पोर्लेकर यांचीही भाषणे झाली. मोर्चात महापौर सौ. स्वाती यवलूजे, माजी आ. दिनकरराव जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, उदयसिंह पाटील-कौलवकर,प्रदेश चिटणीस तौफिक मुल्‍लाणी, संजय पाटील, प्रा. निवास पाटील, करवीरचे सभापती प्रदीप झांबरे, बंडा माने, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अंजना रेडेकर, दीपा पाटील, सरलाताई पाटील, संध्या घोटणे, हिंदुराव चौगले, सचिन चव्हाण, एस.के.माळी, सुशिल पाटील-कौलवकर आदी सहभागी झाले होते.

बैलाच्या पाठीवर लक्षवेधी घोषणा
या मोर्चात चार बैलगाड्या होत्या. बैलांच्या पाठिवर मोदी सरकार हाय हाय, महागाई वाढ करणार्‍या सरकारचा धिक्‍कार असो, अशी अक्षरे लिहिली होती. बैलाच्या पाठिवर लिहिलेली घोषणा लक्षवेधून घेत होती.

बैलगाडीतून मोटारसायकल...
पेट्रोलची दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांना आता सायकलवरुन प्रवास करावा लागणार आहे. काही कार्यकर्ते चक्‍क जुन्या सायकलीवरुन आले होते. तसेच पेट्रोल महाग झाल्याने मोटारसायकल बैलगाडीतून नेण्याची वेळ आली आहे. हे दर्शवण्यासाठी मोटारसायकल बैलगाडीत ठेवून सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.