होमपेज › Kolhapur › काँग्रेस-भाजपला बंडखोरीचा धोका!

काँग्रेस-भाजपला बंडखोरीचा धोका!

Published On: May 19 2018 1:32AM | Last Updated: May 18 2018 10:48PMकोल्हापूर : सतीश सरीकर  

कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदासाठी आता सर्वसाधारण महिला प्रवर्ग (ओपन) असे आरक्षण आहे. विद्यमान सभागृह संपेपर्यंत म्हणजे अडीच वर्षांसाठी हे आरक्षण राहणार असल्याने साहजिकच इच्छुकांची संख्या मोठी आहे. ‘महापौर होणारच’ म्हणून दंड थोपटलेले इच्छुक कोणाचेही ऐकण्याच्या स्थितीत नाही. ‘उमेदवारी मिळाली नाही तर वेगळा विचार करू...’ असे खासगीत इच्छुक बोलत आहेत. परिणामी सत्ताधारी काँग्रेस व विरोधी भाजपला ‘बंडखोरीचा धोका’ आहे, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. बंडखोरी थोपविण्यासाठी ‘नेत्यांची कसोटी’ लागणार असल्याचे सांगण्यात येते. तसेच इच्छुकांच्या हट्टामुळे ‘कारभार्‍यांची डोकेदुखी’ही वाढली आहे.   

काँग्रेस-राष्ट्रवादीतील सत्ता सूत्रानुसार यंदाचे महापौरपद काँग्रेसकडे आहे. भाजप-ताराराणी आघाडीतील वाटाघाटीनुसार महापौरपद निवडणुकीत भाजपचाच उमेदवार असणार असल्याचे सांगण्यात येते. महापौरपदावर सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण असल्याने इच्छुकांनी आग्रह धरला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्येही इच्छुकांची यादी मोठी असून भाजपमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे. अनेक इच्छुकांपैकी एका उमेदवारांचे नाव महापौरपदासाठी निश्‍चित करताना नेतेमंडळींची कसरत होणार हे स्पष्ट आहे. 

सर्वच इच्छुक आपणच महापौरपदासाठी कसे ‘योग्य’ आहोत हे पटवून सांगताना दिसत आहेत. त्यासाठी भेटेल त्या नगरसेवकाला आपल्या नावाची नेत्यांकडे ‘शिफारस’ करण्याची विनंती केली जात आहे. ‘सिनॅरिटी’ व कामाच्या अनुभवाचा दाखला दिला जात आहे. ‘झालो तर महापौरच...’ यासाठी आजपर्यंत एकदाही कोणतेही पद घेतलेले नसल्याचे ठामपणे सांगत आहेत. उमेदवार निवडीत कारभार्‍यांच्या शब्दालाही ‘वजन’ असल्याने काँग्रेस-भाजपमधील कारभार्‍यांकडेही इच्छुकांच्या फेर्‍या वाढल्या आहेत. महापौरपदासाठी उमेदवारी न मिळाल्यास प्रसंगी बंडाची भाषा केली जात असल्याचे सांगण्यात येते.

गेल्या साडेसात वर्षांपासून महापालिकेवर महिलाराज आहे. 2010 ते 2015 या कालावधीत महिलांसाठीच महापौराचे आरक्षण होते. त्यानंतर 2015 ते 2020 या पंचवार्षिक सभागृहातही अडीच वर्षांसाठी ओबीसी (इतर मागास प्रवर्ग) महिला प्रवर्गाचे आरक्षण होते. आता पुढील अडीच वर्षेसुद्धा महिलासाठीच आरक्षण असणार आहे. परिणामी महापालिकेवर सलग दहा वर्षे महापौरपद महिलावर्ग भुषवित आहेत.

ताराराणीला हवी आहे उमेदवारी...

कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आहे. जिल्ह्यातील काही नगरपालिका, पंचायत समितीवरही भाजपने वर्चस्व मिळवून झेंडा फडकवला आहे. काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक फोडून भाजपने बिन आवाजाचा बॉम्ब फोडत महापालिकेत आपला स्थायी सभापती केला आहे. त्यामुळे आता भाजपचा महापौर करून कोल्हापूर महापालिका भाजपच्या ताब्यात असल्याचे नेतेमंडळींना दाखवून द्यायचे आहे, असे सांगण्यात येते; परंतु भाजपचे नगरसेवक 13 अन् ताराराणी आघाडी 19 नगरसेवक असूनही ताराराणी आघाडीला संधी का नाही? अशी विचारणा केली जात आहे. तसेच ताराराणी आघाडीला उमेदवारी दिल्यास शिवसेनेच्या नगरसेवकांना घेऊन महापालिकेत ‘सत्तांतर’ घडवू शकतो, अशी ग्वाहीही दिली जात आहे.