Tue, Apr 23, 2019 23:42होमपेज › Kolhapur › मनपा, जि.प.त डॉ. योगेश जाधव यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर

मनपा, जि.प.त डॉ. योगेश जाधव यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर

Published On: Jun 20 2018 1:33AM | Last Updated: Jun 20 2018 1:23AMकोल्हापूर ः प्रतिनिधी 

उर्वषरत महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दै.‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांचे अभिनंदन करणारा ठराव कोल्हापूर महापालिकेच्या महासभेत मंगळवारी सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेतही अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला. 

जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत झालेल्या ठरावाला अरुण इंगवले सूचक असून राजवर्धन नाईक-निंबाळकर अनुमोदक आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. जाधव यांची नियुक्‍ती केली असून मंडळाच्या अध्यक्षांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या कार्यक्षेत्रात राजधानी मुंबईसह राज्यातील 16 जिल्हे व 161 तालुक्यांचा समावेश आहे. राज्यातील 63 टक्के लोकसंख्या व एकूण क्षेत्रफळापैकी 47 टक्के क्षेत्रफळ मंडळाच्या कार्यक्षेत्रात येते. राज्यातील सहा महसुली विभागांपैकी तीन महसुली विभाग मंडळांतर्गत येतात. यात पुणे, नाशिक व कोकण विभागीय आयुक्‍तांचा समावेश आहे. डॉ. जाधव यांच्या नियुक्‍तीने विकासकामांना अधिक गती येणार आहे. संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण व उत्तर महाराष्ट्राचा विकास व्हावा, यासाठी डॉ. जाधव यांच्यावर राज्य शासनाने अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे, असे ठरावात म्हटले आहे. 

महापालिकेत मांडलेल्या ठरावाला विरोधी पक्षनेता विलास वास्कर हे सूचक आहेत. ताराराणी आघाडी गटनेता सत्यजित कदम व भाजप गटनेता विजय सूर्यवंशी हे अनुमोदक आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील अग्रगण्य दै. ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. जाधव यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली. कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या या पदावर झालेली त्यांची निवड कोल्हापूरच्या नावलौकिकात भर टाकणारी आहे. डॉ. जाधव हे दै. ‘पुढारी’च्या व्यवस्थापकीय संपादकपदासह अनेक सामाजिक संस्थांची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांनी विविध सामाजिक प्रश्‍नांवर सडेतोड भूमिका घेऊन सहभाग घेतला आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांची निवड केली आहे, असे ठरावात म्हटले आहे.