होमपेज › Kolhapur › मनपा सभागृहात बजेटवरून गोंधळ

मनपा सभागृहात बजेटवरून गोंधळ

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांनी शनिवारी महापालिका सभागृहात बजेट (अर्थसंकल्प) सादर केले. परंतु, बजेटची सुधारित कॉपी न मिळाल्याने नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ घातला. नगरसेवकांनी प्रशासनाचा निषेध केला. अध्यक्षस्थानी महापौर स्वाती यवलुजे होत्या. आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी प्रमुख उपस्थित होते. दरम्यान, बजेटची निश्‍चित आकडेवारी समजण्यासाठी सभापती ढवळे यांच्या कार्यालयात पत्रकारांनी तब्बल एक तास घालवला. तरीही ढवळे यांना एकूण 1197 कोटींचे बजेट या व्यतिरिक्‍त एकही आकडेवारी सांगता आली नाही. त्यामुळे सायंकाळपर्यंत बजेटची आकडेवारीच निश्‍चित नसल्याचे स्पष्ट झाले. 

एकाही गरिबाला घर मिळाले नाही

भूपाल शेटे यांनी बजेटमध्ये गेल्या काही वर्षांतील प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे.  आ. सतेज पाटील व आ. हसन मुश्रीफ यांनी आघाडी सरकारच्या काळात बाराशे कोटींचा निधी आणला. परंतु, गेल्या तीन वर्षांत शासनाकडून महापालिकेला काहीच निधी मिळाला नाही. टर्न टेबल लॅडर या अग्‍निशमन दलाकडील वाहनासाठी गेल्यावर्षी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रक्‍कम दिल्याचे जाहीर केले होते. मग आता  पुन्हा बजेटमध्ये त्याचा समावेश का केला आहे, असा आरोप केला. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतून एकाही गरिबाला घर मिळाले नसल्याचे सांगितले. शहरातील दलित प्रभागासह कुष्ठरुग्ण बांधवांसाठी निधी राखीव ठेवला नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तसेच शहरातील 276 जागांसाठी तब्बल दोन हजार कोटींचा टीडीआर दिला असल्याने या जागांच्या माध्यमातून उत्पन्‍नवाढीसाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना केली. तसेच राज्यात सर्वात कमी बजेट असलेली कोल्हापूर महापालिका आहे. महेश सावंत यांनी बजेटची कॉपी नगरसेवकांना वेळेत का दिली नाही, असे म्हणून प्रशासनाचा निषेध केला.  

शिवसेनेचे चार नगरसेवक सर्वाधिक सुखी...

बजेट सादर करताना सभागृहात एकमेकांना कोपरखळी मारण्याच्याही घटना घडल्या. शेटे यांनी आमच्या नेत्यांनी बाराशे कोटी निधी आणल्याचे सांगितल्यावर माजी महापौर सुनील कदम यांनी आमच्या नेत्यांनीही 450 कोटींचा निधी दिल्याचे सुनावले, तसेच शहराचा टोल घालवल्याचे सांगितले. त्यावर शेटे यांनी शहरवासीयांच्या तीव्र आंदोलनामुळे टोल रद्द झाल्याचे ठणकावून सांगितले. त्यावर थेट पाईपलाईनच्या घोटाळ्यावर बोला, कुणी-कुणी किती-किती खाल्ले ते जाहीर करा, असे आव्हान कदम यांनी दिले. त्यावर शेटे यांनी सर्वांचीच नार्को टेस्ट घ्या, असे सांगितले. शिवसेना गटनेता नियाज खान यांनी आम्हाला विसरू नका, असे सांगितल्यावर शेटे यांनी तुम्हाला विसरून कसे चालेल? तुम्ही शिवसेनेचे चारही नगरसेवक सर्वात सुखी आहात. प्रत्येकाला चेअरमनपद मिळत आहे, असा टोला लगावला. त्यावर सभागृहात पुन्हा हास्याचे फवारे उडाले. तर खान यांनी शिवसेना नगरसेवकांवर काँग्रेस-राष्ट्रवादीने अन्याय केल्याचा प्रतिटोला लगावला.  

ब्लड बँकसाठी निधी द्या...

महापालिकेची ब्लड बँक गरिबांसाठी जीवनदायिनी आहे. तीन वर्षांपूर्वी बजेटमध्ये अत्याधुनिकीकरणासाठी बजेटमध्ये 60 लाखांची तरदूत केली होती. परंतु, त्यानंतर ब्लड बँकेकडे दुर्लक्ष झाले. वास्तविक थोडा निधी दिल्यास ही ब्लड बँक राज्यात सर्वश्रेष्ठ ठरू शकते. त्यामुळे निधीची तरतूद करावी, अशी मागणी जयश्री चव्हाण यांनी आयुक्‍त चौधरी यांच्याकडे केली. तौफिक मुल्लाणी यांनी बजेटमध्ये केंद्रीय पातळीवरील कोणत्याच योजनांचा समावेश नसल्याचा आरोप केला. शेखर कुसाळे यांनी इलेक्ट्रिक  बसचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवावा, अशी सूचना केली. केएमटीसाठी जास्तीत जास्त निधी देण्याची मागणी केली. संभाजी जाधव यांनी स्टोअर विभागाचे ऑडिट व्हावे, अशी मागणी केली. भाजप गटनेता विजय सूर्यवंशी यांनीही सूचना केल्या.  

तब्बल दोन तास उशिरा सभा सुरू...

कोल्हापूर महापालिकेची सभा कधीही वेळेत सुरू होत नसल्याचे वास्तव आहे. त्यानुसार शनिवारची सभाही त्याला अपवाद ठरली नाही. बजेटच्या घोळात तब्बल दोन तास उशिरा म्हणजे 11 ची सभा दुपारी एकला सुरू झाली. मात्र, अधिकारीवर्ग सकाळी अकरापासून सभागृहात आले होते. परिणामी, एकूणच सर्वच पक्षाच्या नगरसेवकांना सभेच्या वेळेबाबत गांभीर्य नसल्याचेच त्यावरून दिसून येत असल्याची चर्चा अधिकारीवर्गात सुरू होती. 

मोठ्या निधीच्या गिफ्टची अपेक्षा फोल...

ढवळे यांनी यापूर्वी 2010 मध्ये स्थायी समितीचे सभापतिपद भूषविले होते. यंदा भाजपची महापालिकेत सत्ता नसतानाही ढवळे भाजपचे सभापती झाले आहेत. त्यामुळे साहजिकच ढवळे यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्‍त केल्या जात होत्या. त्यातच भाजपची केंद्रात व राज्यात सत्ता असल्याने कोल्हापूर शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधीचे गिफ्ट मिळेल, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू होती. परंतु, शहर विकासासाठी जास्तीत जास्त निधीची अपेक्षा फोल ठरल्याची चर्चाही सुरू होती.  

Tags : Kolhapur, Koplhapur News, Confusion,  budget, Municipal Hall


  •