होमपेज › Kolhapur › दोन हजारांहून अधिक व्यापार्‍यांच्या मालमत्तेची जप्‍ती

दोन हजारांहून अधिक व्यापार्‍यांच्या मालमत्तेची जप्‍ती

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर :  प्रतिनिधी 

देशामध्ये एकच जीएसटी करप्रणाली लागू झाली असली तरी यापूर्वी असणार्‍या मूल्यवर्धित कराच्या थकबाकीप्रकरणी वस्तू व सेवा विभागाच्या वतीने 2100 व्यापार्‍यांच्या स्थावर जंगम मालमत्ता जप्‍तीची कार्यवाही सुरू केली आहे. तर जीएसटी विवरणपत्रे मुदतीत न भरणार्‍या करदात्यांचाही शोध घेण्याचे काम विभागाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.  

केंद्रसरकारने देशात सर्वत्र एकच जीएसटी करप्रणाली लागू करण्यापूर्वी राज्यामध्ये व्हॅट कर प्रणाली लागू करण्यात आली होती; पण व्हॅटमधील काही किचकट नियमांमुळे हा कर रद्द करावा, अशी मागणी व्यापारी संघटनांकडून होऊ लागली.  केंद्र सरकारने 2017 साली जीएसटी लागू झाल्यानंतर व्हॅट कायदा रद्द करण्यात आला. त्यामुळे व्यापारी वर्गाने सुटकेचा नि:श्‍वास सोडला होता; पण व्हॅट करातील थकबाकीप्रकरणी व्यापार्‍यांना आता नोटीस बजावण्यात आल्या आहेत.  कोल्हापूर वस्तू व सेवा विभागांतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यांतील 2100 थकबाकीदार व्यापार्‍यांना यापूर्वी नोटीस बजावण्यात आल्या आहेत; पण या नोटिसीची फारशी दखल न घेतलेल्या व्यापार्‍यांची स्थावर व जंगम मालमत्ता जप्‍तीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.  

याशिवाय वस्तू व सेवाकरांतर्ग कोल्हापूर विभागामध्ये 71000 व्यापार्‍यांनी व्यवसायाची नोंदणी केली आहे.  गेल्या वर्षभरापासून जीएसटी करप्रणाली लागू करण्यात आली आहे. व्यापार्‍यांनी यामध्ये नियमित विवरणपत्रे भरणे बंधनकारक आहे; पण अजूनही काही व्यापार्‍यांनी विवरणपत्र दाखल केली नसल्याचे विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा व्यापार्‍यांविरोधातही कडक करावाई करण्यात येणार आहे. व्हॅट कराच्या थकबाकीप्रकरणी 2100 जणांच्या जंगम व स्थावर मालमत्तेवरील जप्‍तीच्या कारवाईने  व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

Tags : Kolhapuur, Kolhapur News, Confiscation, assets, two thousand, merchants


  •