होमपेज › Kolhapur › संकलन ठप्प, रस्त्यावर दूध ओतले

संकलन ठप्प, रस्त्यावर दूध ओतले

Published On: Jul 17 2018 1:34AM | Last Updated: Jul 17 2018 12:19AMकोल्हापूर : प्रतिनिधी

गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनामुळे जिल्ह्यात सोमवारी दूध संकलन ठप्प झाले. दूध वाहतूक करणारी वाहने अडवून त्यातील दूध रस्त्यावर ओतून देण्याचा प्रकार महामार्गावर घडला. राज्यातील सर्वात मोठ्या कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ) संकलनच न करण्याचा निर्णय घेतल्याने संघाला सुमारे पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान थेट शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी जिल्ह्यातील संकलन बंद करण्याबरोबर मुंबईला जाणारे दूध आजपासून रोखण्याचा इशारा त्यांनी दिला होता. रविवारी रात्रीच या आंदोलनाची सुरुवात झाली. त्याचे तीव्र पडसाद काही जिल्ह्यांत उमटले. इस्लामपूरजवळ मुंबईला निघालेला खासगी संघाचा टँकर अडवून त्यावर दगडफेक करण्यात आली. कोल्हापूर वगळता इतर जिल्ह्यात दुधाचे टँकर अडवून त्यातील दूध रस्त्यावर ओतून देण्याच्या अनेक घटना घडल्या.

या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर रविवारपासूनच संघटनेच्या कार्यकर्त्यांना बोलवून त्यांच्यावर प्रतिबंधात्म कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या. ही कारवाई झुगारून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. शेतकर्‍यांना पाठिंबा म्हणून राज्यात सर्वाधिक संकलन असलेल्या ‘गोकुळ’ने आजचे संकलन बंद ठेवले. संघाकडे दररोज 11 लाख 50 हजार लिटर दूध संकलन होते, आज हे संकलन बंद राहिल्याने संघाला सुमारे पाच कोटी रुपयांचा फटका बसला. वारणा  संघाने संकलन बंद ठेवले नाही; पण त्यांच्या संकलनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सकाळी साडेदहापर्यंत संघाकडे 81 हजार लिटर दूध संकलन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अशीही जनजागृती

आंदोलनाबाबत संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जनजागृती सुरू आहे. 20 लिटर दुधाला रोज प्रतिलिटर 18 रुपयांप्रमाणे वर्षाला 1 लाख 29 हजार मिळतात. हेच दूध 27 रुपयाने खरेदी केले तर 1 लाख 94 हजार मिळतील. वर्षाला 64 हजार 800 रुपये जादा मिळणार असेल, एक-दोन दिवस संप करून आपले काही नुकसान होणार नाही, असा संदेश संघटनेकडून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘गोकुळ’ला पाच कोटींचा फटका : अध्यक्ष विश्‍वास पाटील

आजच्या आंदोलनामुळे ‘गोकुळ’ने संकलन न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संघाला पाच कोटी रुपयांचा फटका बसला आहे. दूध आले नसले तरी त्यावर प्रक्रियेसाठी कर्मचारी पगार, वाहनांचे भाडे व प्रत्यक्ष दुधाची रक्‍कम पाहता संघाचेही मोठे नुकसान झाल्याचे संघाचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.