Thu, Apr 25, 2019 05:27होमपेज › Kolhapur › मध्यप्रदेशच्या ‘व्यापम’ची महाराष्ट्रात पुनरावृत्ती?

मध्यप्रदेशच्या ‘व्यापम’ची महाराष्ट्रात पुनरावृत्ती?

Published On: Feb 09 2018 2:00AM | Last Updated: Feb 09 2018 12:30PMकोल्हापूर : सुनील कदम

मध्यप्रदेशमध्ये स्पर्धा परीक्षा आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षेमध्ये झालेल्या व्यापम घोटाळ्याप्रमाणे महाराष्ट्रातही या घोटाळ्याची पुनरावृत्ती होत असल्याची परीक्षार्थींची तक्रार आहे. मात्र, शासनाने अजूनही या आरोपाची दखल घेतलेली नाही किंवा त्याच्या चौकशीचे आदेशही दिलेले नाहीत. मात्र, परीक्षार्थींच्या तक्रारीतील गांभीर्य विचारात घेऊन याबाबत सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे.

मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळा देशभर गाजला होता. स्पर्धा परीक्षेशी संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि काही लोकप्रतिनिधींशी संगनमत करून आणि स्पर्धा परीक्षेत गैरप्रकार करून हजारावर अपात्र उमेदवारांनी उच्चपदस्थ शासकीय नोकर्‍या लाटल्या होत्या. जवळपास चार-पाच वर्षे हा प्रकार सुरू होता. ही बाब चव्हाट्यावर आल्यानंतर देशभरातील स्पर्धा परीक्षांवर प्रश्‍नचिन्ह उभा राहिले होते. त्याचप्रमाणे या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान या प्रकरणाशी संबंधित साठहून अधिक लोकांचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला होता तर जवळपास दोन हजारांहून लोकांना अटक झाली होती.

‘व्यापम’च्या माध्यमातून मध्यप्रदेशातील स्पर्धा परीक्षांमध्ये ज्या स्वरूपाचे गैरप्रकार झाले, नेमके तसेच गैरप्रकार महाराष्ट्रातही 2009 सालापासून सुरू असल्याची अनेक स्पर्धा परीक्षार्थींची तक्रार आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये काही डमी विद्यार्थ्यांना बसवून काही शासकीय नोकरदारांनी उच्च पदे लाटली असल्याच्याही त्यांच्या तक्रारी आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील परीक्षार्थींनी मोर्चेही काढले होते. मात्र, शासनाने अजून तरी या मागणीची गांभिर्याने दखल घेतल्याचे दिसत नाही किंवा त्याबाबत चौकशीही केल्याचे दिसत नाही. त्यामुळे परीक्षार्थींच्या मनातील संभ्रम कायम आहे. या संभ्रमामुळे अनेक परीक्षार्थींचा स्पर्धा परीक्षांवरील विश्‍वास उडत चालला आहे तर काही उतावीळ मंडळी आपणालाही ‘व्यापमचा उतारा’ मिळतो काय, याच्या शोधात असलेली दिसतात. मध्यप्रदेश सरकारनेही सुरुवातीच्या काळात तक्रारी झाल्यानंतर त्या तक्रारींकडे दुर्लक्षच केले होते. मात्र, वरिष्ठ पातळीवरून झालेल्या चौकशीत ‘व्यापम’ची भलीमोठी भानगड  उघडकीस आली होती. त्यामुळे जरी या बाबतच्या तक्रारी सध्या प्राथमिक किंवा वैयक्तिक पातळीवरील असल्या तरी शासनाने त्याची गंभीर दखल घेऊन चौकशी करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा एखाद्या दिवशी इथेही ‘व्यापम’सारखा स्फोट अनुभवाला मिळाल्यास आश्‍चर्य वाटायला नको.

इथे फिरते संशयाची सुई!
वैद्यकीय किंवा अन्य शैक्षणिक प्रवेश परीक्षा व काही स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यातील काही ठराविक खासगी संस्थांचेच विद्यार्थी वारंवार यश मिळवीत असल्याबाबत राज्यातील स्पर्धा परीक्षार्थींचा आक्षेप आहे. सातत्याने त्याच त्याच संस्थांमधील विद्यार्थ्यांनाच याबाबतीत यश मिळत असल्यामुळे या क्षेत्रात काम करणार्‍या अन्य संस्थांमध्येही संशयाची पाल चुकचुकत आहे. त्यामुळेच यासाठी ‘व्यापम’सारखे एखादे रॅकेट कार्यरत असावे, अशी आशंका परीक्षार्थी व्यक्तकरताना दिसतात. त्यामुळे या संशयाच्या सुईचा मागोवा घेण्याची गरज आहे.

संबंधित :

पात्रता ‘आचार्या’ची, शासनकृपेने झाला ‘आचारी’!

परीक्षार्थींच्या वाट्याला सामाजिक हेटाळणी!

सरस्वतीच्या लेकरांचा ‘भाकरी’साठी आक्रोश!