Thu, Apr 25, 2019 15:24होमपेज › Kolhapur › आयुक्‍तांकडून ठेकेदार, युनिटीची कानउघाडणी

आयुक्‍तांकडून ठेकेदार, युनिटीची कानउघाडणी

Published On: Jun 13 2018 1:33AM | Last Updated: Jun 12 2018 11:58PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहरासाठी आणण्यात येणार्‍या थेट पाईपलाईन योजनेच्या कामाबाबत आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांनी मंगळवारी तीव्र नाराजी व्यक्‍त करून ठेकेदार जीकेसी कंपनी आणि सल्‍लागार कंपनी युनिटी यांच्या प्रतिनिधींची चांगलीच कानउघाडणी केली. गेल्या वर्षभरात तुम्ही काय केले अशी विचारणा करीत डॉ. चौधरी यांनी प्रश्‍नांचा भडिमार करून झाडाझडती घेतली. आयुक्‍तांच्या या कडक भूमिकेने ठेकेदार आणि युनिटीचे प्रतिनिधी यांची चांगलीच पंचाईत झाली. कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर 2019 पर्यंत योजना मार्गी लावू, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

केंद्र शासनाच्या यूआयडीएसएसएमटी कार्यक्रमांतर्गत 24 डिसेंबर 2013 ला कोल्हापूरसाठी थेट पाईपलाईन योजना मंजूर झाली. सुमारे 53 कि. मी. लांबीच्या पाईपलाईनचे काम आहे. जीकेसी या ठेकेदार कंपनीला 24 ऑगस्ट 2014 ला  वर्कऑर्डर दिली आहे.  या कामासाठीचा कालावधी 22 नोव्हेंबर 2016 ला संपला. कासवाच्या गतीने सुरू असलेल्या थेट पाईपलाईनच्या ठेकेदाराला फेब्रुवारी 2017 मध्ये दीड वर्षासाठी एकदा मुदतवाढ दिली होती. त्याची मुदतही 31 मे 2018 रोजी संपली आहे. आता पुन्हा एकदा मुदतवाढीचा प्रस्ताव दिला आहे. असे असले तरी या योजनेचे आतापर्यंत सरासरी साठ टक्के काम पूर्ण झाले आहे. तब्बल दीड कोटीवर फी घेऊन युनिटी कन्सल्टंट ही कंपनी निवांत आहे. या पार्श्‍वभूमीवर महापौर सौ. शोभा बोंद्रे, आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी  व पदाधिकार्‍यांनी मंगळवारी या योजनेची पाहणी केली. यावेळी पाईपलाईन कामातील अडथळे जॅकवेल आणि 

इंटेकवेल उभारणीत आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे आपण काम वेळेत पूर्ण करू शकलो नसल्याचे ठेकेदाराने आयुक्‍तांच्या निदर्शनास आणून दिले.  पुईखडी येथील जलशुद्धीकरण केंद्रास भेट दिल्यानंतर आयुक्‍तांनी संबंधित ठेकेदारास कामाच्या प्रगतीबाबत विचारणा केली. 80 एमएलडी पाणी शुद्धीकरण करण्याचा प्रकल्प उभारण्यात येत असून वाळूची उपलब्धता नसल्याने काम रेंगाळले. मात्र, सध्या वाळू उपलब्ध असून काम गतीने करण्याची ग्वाही दिली. या ठिकाणी सुमारे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. तुरंबे येथील पाईपलाइंन कामास भेट दिली. त्या ठिकाणी पाईपलाईन खोदण्यात आलेल्या रस्ता अद्याप केला नसल्याने पदाधिकार्‍यांनी ठेकेदारास धारेवर धरले. एक कि.मि. अंतराच्या या मार्गाचे पावसाळ्यात खडीकरण करुन पावसाळ्यानंतर सिलकोट करुन डांबरीकरण पूर्ण केले जाईल असे सांगण्यात आले. मांगोली, सोळांकुर या ठिकाणी पाहणी करण्यात आली. तेथील पाईपलाईनचे काम का थांबले याबाबत  विचारणा केली. काळम्मावाडीधरणानजिकच्या राजापूरवाडी येथील जॅकवेल आणि इंटेकवेल कामाच्या ठिकाणी भेट देण्यात आली. यावेळी आयुक्‍त डॉ. चौधरी आणि  महापौर सौ. बोंद्रे यांनी ठेकेदार कंपनीचे राजेंद्र माळी यांच्यासह युनिटीचे राजेंद्र हसबे, महापालिकेचे जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला. एक वर्षात तुम्ही किती काम केले?  सल्‍लागार कंपनी म्हणून तुम्ही कोणती जबाबदारी पार पाडली. महापालिकेचे अभियंते म्हणून या प्रकलपाच्या कामाच्या टार्गेट तपासणी केली का ? इंटेकवेल असो अथवा जॅकवेल असो या कामाची गती वाढविण्यात आली का ? पावसाळ्यापूर्वी ही कामे पुर्ण करण्याचे नियोजन का केले नाही अशी प्रश्‍नांची सरबत्ती करुन सर्वांना चांगलेच धारेवर धरले. 

इंटेकवेलचे काम करण्यासाठी कॉपर डॅम उभारण्यात आला आहे. 446 मिटर या कॉपर डँममध्ये प्लास्टीक शीट घालुन पाणी झिरपू नये याची खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच त्यातूनही या डॅममध्ये येणारे पाणी उपसा करण्यासाठी 500 ते 600 अश्‍वशक्‍ती क्षमतेचे इंजिन माविण्यात आले आहे. यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे ठेकेदारांकडून सांंगण्यात आले. तसेच जॅकवेलसाठी 45 मिटर खोल खुदाई करण्यात अली असून आणखी एक मिटर खुदाई अपेक्षीत आहे. पावसाने उपडीप दिल्यास येथील खुदाईसह पीसीसीचे काम आठदिवसात पुर्ण करण्याचे  नियोजन असल्याचे स्पष्ट केले. तसेच या ठिकाणी वन्यजिवांचा धोका असून रात्री नउ नंतर काम करणे जिकीरीचे आहे. असे काम करताना वनविभागने कंपनीच्या अधिकार्‍यांना अटक केली  हमीपत्र देउन सुटका करुन घेण्यात आल्याचे माळी यांनी सांगितले. यावर डॉ. चौधरी यांनी वन्यजिव समस्या यापूर्वी का सांगितली नाही असा जाब विचारला. 

एकुण 53 किमि पाईपलाईनपैकी 37 किमि. पाईपलाईचे काम पुर्ण झाले आहे. आता विनाअडथळा केवळ चार किमि पाईपलाईन टाकता येते. उर्वरीत ठिकाणी अडचणी आहेत. सोळांकुर येथे एक ते दिड किमि. ठिकपुर्ली येथे 500 मिटर काम प्रलंबित आहे. कपिलेश्‍वर येथे दोन किमी आणि महावितरण कंपनीने पोल आणि केबल शिफ्टींग न केल्याने सहा किमि पाईपलाईन टाकण्यात अडथळा आहे. यापैकी सोळांकुर येथील कामाबाबत आ. सतेज पाटील ए. वाय. पाटील यांच्याशी चर्चा करुन गावकर्‍यांची समजूत काठण्यात येणार आहे. कपिलेश्‍वर येथीलसमस्या सोडविली जाईल असे सांगण्यात आले. 
युनिटी कंन्स्ल्टंन्सीकडून लोखंडी ब्रिजबाबत पैसे वसूल केले आहेत. आताही डिझाईनबाबत या कंपनीबाबत आक्षेप आहे याची तपासणी करुन आणखी त्रूटी आणि आक्षेत लक्षात घेउन कारवाई केली जाईल. असे आयुक्‍त डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले. पहिल्या मूदतवाढीत ठेकेदारास महापालिका प्रशासनाकडून काही नाहरकत मिळालेली नव्हती त्यामुळे पाच हजार रुपये प्रतिदिन दंड आकारला आहे. आताची परिस्थिती वेगळी आहे याबाबत विचारपूर्वक निर्णय घेतला जाईल असे चौधरी यांनी स्पष्ट केले. या पाहणी दौर्‍यात महापौर सौ. शोभा बोंद्रे, उपहापहापौर महेश सावंत सभागृह नेता दिलीप पोवार, दिपा मगदूम सुरमंजिरी लाटकर, सौ. शोभा कवाळे,  डॉ. संदीप नेजदार, राहुल माने, अशोक जाधव, संजय मोहीते उपस्थित होते. 
चौकट 

महावितरणमुळे कामात अडथळा 

या योजनेत पाईपलाइंन टाकताना महावितरणचे पोल आणि काही केबल अडव्या येत आहेत. याबाबत महावितरण अधिकार्‍यांशी संपर्क साधला आहे. मात्र काही प्रतिसाद मिळत नसल्याने या कामात अडथळा येत आहे. हे काम सार्वजनिक आहे. शहरवासियांसाठी आहे.त्यामुळे महावितरणसह इतर विभागानी आपआपल्या विभागाची जबाबदारी घेउन योजना मार्गस्थ लावण्यास मदत करावी असे आवाहन आयुक्‍त डॉ. चौधरी यांनी केले. 

जीकेसीचा मूदतवाढीचा प्रस्ताव 

पाईपलाईनचे कामाचासाठी 24 ऑगस्ट 2014 ला  वर्कऑर्डर दिली आहे. 22 नोव्हेंबर 2016 मूदत संपली आहे.  ठेकेदाराला फेब्रुवारी 2017 मध्ये दीड वर्षासाठी प्रथम मूदतवाढ मुदतवाढ दिली होती. त्याची मूदतही 31 मे 2018 रोजी संपली आहे. आता पुन्हा एकदा मूदतवाढीचा प्रस्ताव दिला आहे. प्रशासनाने अद्याप निर्णय घेतलेा नाही. 

प्रसंगी पोलिस बंदोबस्तात काम करणार  

सोळांकुर येथील ग्रामस्थांनी महापालिकेस शब्द दिला आहे. त्यामुळे तेथे काम सुरू करताना काहीजण अडथळा करीत आहेत. मात्र, याबाबत आ. सतेज पाटील आणि ए. वाय. पाटील यांच्याशी चर्चा केली जाईल. त्याद्वारे ग्रामस्थांशी संवाद साधून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल यातूनही मार्ग न निघाल्यास प्रसंगी पोलिस बंदोबस्तात काम सुरू केले जाईल, असा इशारा आयुक्‍त डॉ. चौधरी यांनी दिला.