कोल्हापूर : प्रतिनिधी
आजोबा जिल्हा न्यायाधीश, वडील वायुदलात अभियंता. त्यामुळे लहानपणापासूनच देशसेवेबाबत मोठे आकर्षण. त्यातूनच आपणही देशसेवेसाठी सैन्य दलातच जायचे, असा निर्धार करून अपार कष्ट व जिद्दीच्या जोरावर सैन्य दलात जाऊन सध्या कर्नल पदावर कार्यरत असलेले कोल्हापूरचे सुपुत्र जयवंत विठ्ठलराव महाडिक (वय 50) यांचा अपघाताने स्वतःजवळील रिव्हॉल्व्हरमधून गोळी उडाल्याने मृत्यू झाला. सोमवारी (ता. 25) सायंकाळी पाच वाजता ही घटना जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथील खुद्रू गावात घडली. घटनेची माहिती मंगळवारी कोल्हापुरात समजताच त्यांच्या मित्रपरिवारासह नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
देशातील सर्वात मोठा शस्त्रसाठा अनंतनाग येथे आहे. त्याचे प्रमुख म्हणून कर्नल महाडिक कार्यरत होते. सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ते आपल्या आर्मीच्या जीपमधून कामावरून परत येत होते. त्यावेळी एका स्पीडब्रेकरवर त्यांची जीप जोरात आदळली. त्याचवेळी त्यांच्या कंबरेला लावलेला पिस्तूलला धक्का बसून त्यातील एक गोळी थेट त्यांच्या मानेत घुसली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना आर्मीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कोल्हापुरातून महाडिक यांचे मामा रणजित चव्हाण व त्यांचे कुटुंबीय तातडीने रात्रीच दिल्लीला रवाना झाले.
महाडिक यांचे शालेय शिक्षण सेंट झेव्हियर्स हायस्कूलमध्ये तर बारावीपर्यंतचे गोखले कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर ‘एनडीए’त त्यांनी प्रवेश मिळवला. ‘एनडीए’तील खडतर शिक्षणानंतर त्यांनी इंडियन मिलिटरी अॅकॅडमीत प्रवेश घेतला. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1989 मध्ये ते सैन्य दलात रुजू झाले. रडारच्या प्रशिक्षणासाठी त्यांची अमेरिकेलाही निवड झाली होती. देवळाली-नाशिक येथे कमांडिंग ऑफिसर, बंगळूर येथील डीआरडीसीचे चीफ या पदावर त्यांनी काम केले आहे.
देशसेवेची कौटुंबिक पार्श्वभूमी
महाडिक यांच्या कुटुंबीयांचे वास्तव्य सुभाष रोडवरील महापालिकेच्या कार्यशाळेसमोर होते. ही मालमत्ता विकून ते दिल्लीत स्थायिक झाले होते. आजोबा दिनकरराव भुजंगराव मोहिते हे जिल्हा न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले होते. त्यांचे वडील विठ्ठलराव महाडिक हे वायुसेनेत अभियंता होते, त्यांच्या पत्नी सौ. अल्पना या सैन्य दलातूनच मेजर पदावरून निवृत्त झाल्या आहेत. त्यांना 14 वर्षांचा मुलगा आहे.
‘टायगर महाडिक’ अशी ओळख
कर्नल महाडिक यांनी कारगिल युद्धातही महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली होती. त्यांनी स्वतः 14 ते 15 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अबु राफी या खतरनाक दहशवाद्याला त्यांनी ठार मारल्यानंतर सैन्य दलात त्यांची ओळख ‘टायगर महाडिक’ अशी निर्माण झाली होती. त्यांचे सहकारीही त्यांना याच नावाने बोलवत होते, अशा आठवणी त्यांचे मामा रणजित चव्हाण यांनी सांगितल्या.