Wed, Apr 24, 2019 16:12होमपेज › Kolhapur › रेशनवर ‘मका’ देऊन लोकांची थट्टा करता का

रेशनवर ‘मका’ देऊन लोकांची थट्टा करता का

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 14 2018 11:19PMकोल्हापूर : प्रतिनिधी

रेशनवरील गहू कमी करून मका देण्यात येणार आहे, हा मका देऊन लोकांची थट्टा सुरू केली आहे का, असा संतप्त सवाल शिवसेनेने जिल्हा प्रशासनाला केला. रेशनवरून मका वितरीत करण्याचा निर्णय तातडीने रद्द करा, अशी मागणी करण्यात आली. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी निदर्शने करण्यात आली. माणसेच काय पण जनावरही हा मका घात नाहीत, हे दाखवण्यासाठी आंदोलनात म्हैसही सहभागी करण्यात आली होती.

रेशनवरून प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना एक रुपये किलो दराने मका देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, गहू कमी करून हा मका दिला जाणार आहे. मुळात मका हा खात नाही, त्याच्या भाकर्‍याही नीट होत नाही, जनावरांना दिला तर त्याचा दुधावर परिणाम होतो, असे असतानाही मका देण्याचा घाट घातला जात आहे तो तातडीने बंद करा. मका वितरण सुरू झाले तर उद्रेक होईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने झाल्यानंतर मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, रेशनवरील गहू कमी करून लोकांना मका दिला जाणार आहे. ही त्या लोकांची, माणुसकीचीच थट्टा आहे.ज्यांनी निर्णय घेतला त्या मंत्र्यांना काय समजते की नाही, त्यांनाच मक्क्याची भाकरी खायला घातली पाहिजे.याबाबत तातडीने निर्णय झाला नाही तर आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी शिवसेना प्रमुख संजय पवार, शहर प्रमुख दुर्गेश लिंग्रस यांनीही तीव्र भावना व्यक्त केल्या.

यावेळी शहर प्रमुख शिवाजी जाधव, जिल्हा महिला संघटक शुभांगी पोवार, रवी चौगुले, राजेंद्र जाधव, हर्षल सुर्वे, तानाजी आंग्रे, राजू यादव, संभाजी भोकरे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने  सहभागी होते.

...अन् म्हैस उधळली

या आंदोलनात एक म्हैस सहभागी करण्यात आली होती. आंदोलक निदर्शने करता असताना म्हशीला पुढे घेण्याच्या प्रयत्नात ती उधळली. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लावलेल्या दुचाकी धक्का लागून पडल्या. म्हशीच्या मालकाने तत्काळ तिला नियंत्रणात आणले. मात्र, काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.