Mon, May 20, 2019 20:19होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात काँग्रेससह मित्रपक्षांचे आंदोलन ः शाळा, कॉलेजना सुट्टी

कोल्हापुरात बंदला संमिश्र प्रतिसाद

Published On: Sep 11 2018 1:36AM | Last Updated: Sep 10 2018 11:54PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँगे्रसने पुकारलेल्या भारत बंदला कोल्हापुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदमुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली, तर एस.टी.सह केेएमटीची धावही दुपारपर्यंत थांबली. रिक्षा वाहतूक मात्र सुरळीत सुरू होती. बंद काळात जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. 

पेट्रोल, डिझेलसह गॅसच्या किमतीत गेल्या काही दिवसांत झालेल्या भरमसाट वाढीचा निषेध करण्यासाठी काँगे्रसने आज (सोमवारी) भारत बंदची हाक दिली होती. या आंदोलनाला राष्ट्रवादीसह शिवसेना, मनसे व इतर पक्षांनीही पाठिंबा दिला होता. प्रत्यक्षात मनसेवगळता इतर पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते रस्त्यावर दिसले नाहीत.

बंदच्या पार्श्‍वभूमीवर शाळा व महाविद्यालयांना सकाळीच सुट्टी देण्यात आली. प्रार्थना घेऊन शाळा सोडून देण्यात आल्या. सकाळी सुरू असलेली केएमटी व एस.टी. बससेवा 11 नंतर बंद करण्यात आली. रिक्षा वाहतूक मात्र दिवसभर सुरू होती. स्टेशन रोड, राजारामपुरी मेन रोड, महाद्वार रोड, चप्पललाईन, पापाची तिकटी, शिवाजी रोड, लक्ष्मीपुरी या शहराच्या प्रमुख मार्गांवरील दुकाने दुपारपर्यंत बंद राहिली. पेट्रोल पंपचालकांनीही दुपारपर्यंत पंप बंद ठेवून आंदोलनात सहभाग नोंदवला. 

बंदचे आवाहन करण्यासाठी काँगे्रसच्या वतीने महापौर शोभा बोंद्रे, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील मोटारसायकल रॅली काढण्यात आली. दाभोळकर कॉर्नर येथून रॅलीला सुरुवात झाली. मध्यवर्ती बसस्थानक, व्हीनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी, महापालिका, शिवाजी चौक, गुजरी, महाद्वार रोड, लक्ष्मी टॉकिज, रंकाळा स्टँड, पापाची तिकटी, धान्यलाईन, राजारामपुरीमार्गे काँगे्रस कमिटीत सांगता झाली. रॅलीतील कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती बसस्थानकावर जाऊन मुख्य दरवाजा बंद करून एस.टी.ची वाहतूक बंद पाडली, त्याच मार्गावरील केएमटीही रोखून धरल्या. त्यामुळे या दोन्हीही सेवा दुपारपर्यंत बंद राहिल्या. 

आंदोलनात महिला काँगे्रसच्या शहराध्यक्षा संध्या घोटणे, प्रदेश उपाध्यक्षा सरला पाटील, नगरसेवक तौफिक मुल्लाणी, प्रवीण केसरकर, दिलीप पोवार, जयश्री चव्हाण, उमा बनछोडे, माजी उपमहापौर विक्रम जरग, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, सुरेश कुराडे, एस. के. माळी, दीपा पाटील, चंदा बेलेकर, वैशाली महाडिक, दयानंद नागटिळे, अमर देसाई, किरण मेथे आदी सहभागी झाले होते.

काँगे्रस नेते मुंबईत 

लोकसभा निवडणुकीसंदर्भात दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत बैठक होती. या बैठकीला गेल्याने काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील आंदोलनात दिसले नाहीत. राष्ट्रवादीचे जयकुमार शिंदेवगळता पक्षाचा एकही नेता, नगरसेवक, दुसर्‍या फळीतील कार्यकर्ते आंदोलनात दिसले नाहीत. मनसेच्या वतीने मिरजकर तिकटी येथे इंधन दरवाढीविरोधात निदर्शने करण्यात आली.

काँगे्रस कार्यकर्त्यांत हाणामारी

इंधन दरवाढीविरोधात पुकारलेल्या बंदचे आवाहन करण्यासाठी काँगे्रसने काढलेल्या रॅलीतच दोन कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी झाली. काँगे्रस कमिटीसमोरच घडलेल्या या प्रकाराने तणाव निर्माण झाला. नगरसेवक तौफिक मुल्लाणी व पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला. काँगे्रस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दाभोळकर कॉर्नरजवळून बंदचे आवाहन करण्यासाठी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली मध्यवर्ती बसस्थानकमार्गे पुन्हा काँगे्रस कमिटीच्या दारात आल्यानंतर किरकोळ कारणावरून दोन कार्यकर्त्यांत हाणामारी सुरू झाली. अर्वाच्य शिवीगाळ करत एकाने दुसर्‍याला बेदम चोप द्यायला सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने वातावरण तणावपूर्ण बनले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपस्थित पोलिस व मुल्लाणी यांनी हा वाद मिटवून दोन्ही कार्यकर्त्यांना बाजूला केले. त्यानंतर रॅलीला पुन्हा सुरुवात झाली; पण या हाणामारीचीच चर्चा सुरू राहिली.