Fri, Aug 23, 2019 14:27होमपेज › Kolhapur › सहकार पंढरीत बहरतेय ‘खासगी’चे पीक!

सहकार पंढरीत बहरतेय ‘खासगी’चे पीक!

Published On: Feb 16 2018 1:52AM | Last Updated: Feb 16 2018 12:00AMहमीदवाडा : मधुकर भोसले

संपूर्ण देशाला सहकाराची दिशा देणारे राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याची ओळख आहे. सहकारी साखर कारखानदरीचा वैभवशाली काळ पाहिलेल्या याच सहकार पंढरीत सध्या मात्र खासगी कारखानदारीचे पीक जोमात येताना दिसते. थोडासा फरक सोडता राज्यात गाळप घेणार्‍या सहकारी कारखान्यांच्या बरोबरीने खासगीची संख्या आली आहे. गेल्या सात-आठ वर्षांचा विचार करता, राज्यात गाळप घेणार्‍या सहकारी कारखान्यांची संख्या 18 ने घटली आहे तर त्याचवेळी खासगीची संख्या मात्र 37 ने वाढली आहे.

‘विना सहकार नही उद्धार’ हे ब्रीद घेऊन राज्यात सहकार चळवळ नेटाने रूजली, वाढली या चळवळीने सामान्यांचा उद्धारही झाला; पण त्याचवेळी राजकारणासाठी एक सशक्त माध्यम म्हणून या चळवळीकडे राजकारणी पाहू लागले व त्यामुळेच सद्यपरिस्थितीत सहकारी दूध संस्था, सेवा संस्था ते काही जिल्हा बँका व साखर कारखाने यांना आर्थिक आजाराने ग्रासले. साखर कारखानदारी हा महाराष्ट्राच्या कृषी जीवनाचा महत्त्वाचा आयाम आहे. या कारखानदारीवर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कोट्यवधी कुटुंबे अवलंबून आहेत. गेल्या दहा वर्षांत बंद पडलेल्या सहकारी साखर कारखान्यांची संख्या ही 40 च्या आसपास आहे. हे चित्र वेदनादायी आहे. 1955 मध्ये सहकार महर्षी पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील यांनी आशिया खंडातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ प्रवरानगर कारखान्याच्या निमित्ताने रोवली. या कारखान्याच्या उद्घाटनास तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. तेथून पुढे सहकार कारखानदारी वेगाने धावली. मात्र, पुढे हा सहकार स्वाहाकाराच्या निमित्ताने बेजार होत गेला. 

2011 मध्ये राज्यात 166 साखर कारखान्यांनी गाळप घेतले. त्यामध्ये सहकारीची संख्या 117 होती. तर खासगी कारखान्यांची संख्या 49 होती. विशेष म्हणजे यावेळी सहकारी साखर कारखान्यांची संख्या 156 वरून बंद पडलेल्या कारखान्यांमुळे 117 इथंपर्यंत आली होती. गेल्या वर्षीच्या (2016 - 2017) गळीत हंगामात एकूण 149 कारखान्यांनी गाळप घेतले. त्यामध्ये सहकारी साखर कारखान्यांची संख्य 87 तर खासगीची संख्या 62 होती. तर या वर्षीच्या गळीत हंगामामध्ये एकुण 185 साखर कारखाने सुरू आहेत. त्यामध्ये सहकारी साखर कारखान्यांची संख्या 99 आहे. तर खासगीची संख्या 86 आहे. गतवर्षीपेक्षा गाळप घेणार्‍या सहकारी साखर कारखान्यांची संख्या ही 12 ने वाढली आहे. मात्र, खासगीची संख्या त्याहून अधिक 24 ने वाढली आहे. तर गेल्या आठ वर्षांचा विचार करता सहकारी कारखाने 18 ने घटले तर खासगी मात्र 37 कारखाने वाढले. व्यवस्थापन व काटेकोरपणात खासगी कारखाने सहकारी साखर कारखान्यांपेक्षा खूपच सशक्त होतानाचे चित्र आहे.