Tue, Apr 23, 2019 19:35होमपेज › Kolhapur › साक्षीदारविरुद्धची शस्त्र तस्करी तक्रार ‘क्‍लोज’

साक्षीदारविरुद्धची शस्त्र तस्करी तक्रार ‘क्‍लोज’

Published On: Dec 24 2017 1:44AM | Last Updated: Dec 23 2017 11:40PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : दिलीप भिसे

ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे खून खटल्यातील साक्षीदार संजय साडविलकरविरुद्ध आरोपी समीर गायकवाडने शस्त्र तस्करीप्रकरणी दाखल केलेली तक्रार जुना राजवाडा पोलिसांनी फाईलबंद केली आहे. साक्षीदाराच्या घरासह दुकानाची झडती घेतली. मात्र, कोणतेही महत्त्वाचे पुरावे हाती लागले नाहीत. चौकशीत अन्य नवीन साक्षीदारही निष्पन्‍न झाले नाहीत, असे तपासाधिकार्‍यांनी तक्रारदाराला दिलेल्या लेखीपत्रात स्पष्ट केले आहे.

संजय साडविलकर (रा. रविवार पेठ, कोल्हापूर) हे ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, पानसरे खून खटल्यातील साक्षीदार आहेत. पुरोगामी नेत्यांच्या खून खटल्यात साडविलकर याचा सीबीआय व एसआयटी पथकासमोर जबाब झाला आहे. शिवाय भारतीय दंडविधानसंहिता कलम 164 नुसार न्यायदंडाधिकार्‍यासमोर नोंदविलेला जबाब महत्त्वाचा पुरावा ठरणारा आहे.

जबाबात शस्त्र तस्करीची कबुली...

तपासाच्या अनुषंगाने साडविलकर यांनी तपास पथकांना दिलेल्या जबाबात 1988 ते 1990 या काळात उत्पन्‍नाचे कोणतेही साधन नसल्याने घातक शस्त्रांची खरेदी, विक्री, दुरुस्तीची कामे करीत होतो, असे म्हटले आहे.

साडविलकरांच्या जबाबाच्या आधारे पानसरे यांचे मारेकरी समीरच्यावतीने वकील समीर पटवर्धन, अ‍ॅड. वीरेद्र इचलकरंजीकर यांनी 21 नोव्हेंबरमध्ये जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. साडविलकरच्या गुन्हेगारी कृत्याची चौकशी  होऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

या पार्श्‍वभूमीवर तपास अधिकारी अनिल गुजर यांनी साडविलकरविरुद्ध दाखल तक्रार अर्ज चौकशीअंती बंद करण्यात आल्याचे समीरला पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा आधार

‘ललित कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे साडविलकरविरुद्ध तक्रारीची चौकशी करण्यात आल्याचे पत्रात स्पष्ट केले आहे. गैरअर्जदाराकडे चौकशी करण्यात आली. चौकशीच्या अनुषंगाने अन्य साक्षीदार निष्पन्‍न झाले नाहीत. न्यायालयाच्या आदेशानुसार साक्षीदाराचे घर, दुकानाची झडती घेण्यात आली. त्यात संशयास्पद वस्तू, पुरावा उपलब्ध झाला नाही.

साडविलकर यांचा राजारामपुरी पोलिस ठाणे गु.र.नं.39/2015 भा.दं.वि.स.कलम 302,34 सह आर्म अ‍ॅक्ट कलम 3,25, प्रमाणे सेशन केस 03/2016 मध्ये त्यांनी दिलेला व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यासमोर सीआरपीसी कलम 164 प्रमाणे नोंदविलेला जबाब या गुन्ह्यात पुराव्याचा भाग म्हणून न्यायालयाच्या विचाराधिन आहे. तसेच याप्रकरणाची सत्र न्यायालयाने सीपीआरसी कलम 193 अन्वये दखल घेतली आहे व न्यायप्रविष्ट असल्याचे गुजर यांनी पत्रात नमूद केले आहे.