Mon, May 20, 2019 09:01होमपेज › Kolhapur › ‘एसटीपी’ नसणारे उद्योग बंद करा

‘एसटीपी’ नसणारे उद्योग बंद करा

Published On: Jul 12 2018 1:41AM | Last Updated: Jul 12 2018 1:00AMकोल्हापूर : प्रतिनिधी

सांडपाणी प्रक्रिया केंद्र नसणारे उद्योग बंद करा, असे आदेश विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले. लाँड्री, हॉटेल व्यवसाय, सर्व्हिसिंग सेंटरसह हॉस्पिटल यांच्यावरही कायद्यानुसार कारवाई करावी, असे स्पष्ट करत प्रदूषणकारी घटकांचे सविस्तर सर्वेक्षण करा, त्याचा 15 ऑगस्टपर्यंत अहवाल द्या, अशी सूचनाही त्यांनी केली.पंचगंगा नदी प्रदूषणासंदर्भात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी बैठक झाली. डॉ. म्हैसेकर म्हणाले, पंचगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात किती औद्योगिक घटक, कारखाने आहेत, ते किती पाणी वापरतात, किती पाण्यावर प्रक्रिया करतात, किती पाणी बाहेर सोडतात, याबाबतचे पुन्हा सविस्तर सर्वेक्षण 15 ऑगस्टपर्यंत एमआयडीसीने पूर्ण करावे. ज्या उद्योगांकडे सांडपाणी प्रक्रिया केंद्र नाही, त्यांच्यावर सक्‍त कारवाई करावी. ज्यांच्याकडे अशी व्यवस्था आहे, मात्र त्याचा त्यापद्धतीने वापर नाही, त्यांना मुदत देऊन ते कार्यान्वित करावेत. पंचगंगा नदीत लघु तसेच मध्यम उद्योग घटकाकडून सोडले जाणारे पाणी तसेच इचलकरंजीच्या काळ्या ओढ्यात येणारे पाणी याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने जिल्हाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना व कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.

पंचगंगा नदीकाठावरील गावांमधून नदीत सांडपाणी येणार नाही, यासाठी त्या-त्या गावात सांडपाणी प्रक्रिया केंद्र विकसित करावे, यासाठी  उपलब्ध असणारी शासकीय जमीन मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. या कामास प्राधान्य द्यावे, अशी सूचना करत डॉ. म्हैसेकर म्हणाले, इचलकरंजी शहरातील हँड प्रोसेसिंग युनिटमधून बाहेर पडणार्‍या पाण्याबाबतही आवश्यक उपाययोजना करा. कोल्हापूर प्राधिकरणातील नदीकाठच्या गावांमध्ये सॉलिडवेस्ट व लिक्‍विडवेस्टबाबतही उपाययोजनासाठी नियोजन करा. नमामि पंचगंगा या उपक्रमाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आवश्यकतेनुसार परिपूर्ण प्रस्ताव तयार करा, अशी सूचनाही त्यांनी केली. पंचगंगा नदीकाठावरील 38 गावांसाठी सांडपाणी व घनकचरा निर्मूलनाचा 94 कोटींचा आराखडा शासनास सादर केला असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी सांगितले.

महानगरपालिकेच्या वतीने एसटीपी प्लँट पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावा, जेणेकरून शहरातील सांडपाण्याचा एकही थेंब थेट नदीत मिसळणार नाही, यासाठी आवश्यक त्या सर्व उपायायोजना प्राधान्याने कराव्यात, शहरातील कोणत्याही  नाल्यातून पाणी थेट नदीत मिसळणार नाही, याची दक्षता घ्या. पावसाळ्यातही नाल्याचे पाणी प्रक्रिया होऊनच पुढे जाईल याची दक्षता घ्या, शहरातील नागरिकांचा मैला थेट एसटीपीला जात नाही, त्यासाठी तातडीने ड्रेनेजलाईनद्वारे तो प्रक्रिया केंद्रांत जाईल, याची व्यवस्था करावी, गणेशोत्सवात न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. महापालिका आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांनी जयंती नाला, दुधाळी, बापट कॅम्प, लाईन बजार येथील सांडपाण्याचे शुद्धीकरणाच्या उपाययोजनांचे काम डिसेंबरअखेर पूर्ण होईल, असे सांगितले. सर्व यंत्रणांनी पंचगंगा प्रदूषण मुक्‍तीसाठी परस्परांत समन्वय ठेवून, कालबद्ध कार्यक्रमाद्वारे काम करावे, उच्च न्यायालयाचा अवमान होणार नाही, यादृष्टीने प्रदूषण नियंत्रणाबाबत काम करावे, असे आवाहनही डॉ. म्हैसेकर यांनी केले.

बैठकीस जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, उपजिल्हाधिकारी मुकेश काकडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नागेश लोहाळकर, उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, महापालिकेचे जलअभियंता एस. बी. कुलकर्णी,  जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे एस. एस. शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रापुरे, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस. बी. भोई, प्रांताधिकारी सचिन इथापे, समीर शिंगटे, जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन देसाई, एम आय. डी. सी. चे प्रादेशिक अधिकारी डी. टी. काकडे यांच्यासह विविध सर्वसंबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पंचगंगा कृती आराखड्याचे काय झाले?

ही बैठक सुरू असताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी डॉ. म्हैसेकर यांची भेट घेतली. पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी खा. संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 23 मार्च 2017 रोजी भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यावर पंतप्रधानांनी 11 एप्रिल 2017 रोजी पंचगंगा प्रदूषण मुक्‍तीचा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. हे पत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्राप्त होऊन वर्ष उलटले. या पंचगंगा कृती आराखड्याचे काय झाले, असा सवाल विचारत माने यांनी याप्रकरणी आराखडा तयार करून त्याद्वारे कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी अमर पाटील उपस्थित होते.

सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची पाहणी

बैठकीपूर्वी विभागीय आयुक्‍त डॉ. म्हैसेकर यांनी दुधाळी सांडपाणी प्रक्रिया केंद्राला भेट दिली. यानंतर त्यांनी जयंती नाल्यालाही भेट देऊन पाहणी केली. यापुढे दर तीन महिन्यांनी बैठक होईल, असे सांगत प्रदूषण मुक्‍तीसाठी सुरू असलेल्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी तांत्रिक अधिकार्‍यांची कंत्राटी, मानसेवी आदी तत्त्वावर नियुक्‍ती करा, असेही त्यांनी सांगितले.