होमपेज › Kolhapur › लिटर सक्ती केल्यास दूध संकलन बंद

लिटर सक्ती केल्यास दूध संकलन बंद

Published On: Jun 02 2018 2:01AM | Last Updated: Jun 02 2018 2:00AMकोल्हापूर : प्रतिनिधी

दूध संस्थांना वजनमापाऐवजी लिटरवर दूध घेण्यासाठी सक्ती केल्यास पश्‍चिम महाराष्ट्रातील दूध संकलन बंद करू, असा इशारा कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील दूध उत्पादक संघ व संस्थांनी शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे दिला. यावेळी आपल्या भावना शासनास कळवत असताना लिटरमध्ये दूध संकलन करताना येणार्‍या अडचणीही शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या जातील, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शिष्टमंडळाला दिले.

दूध उत्पादक शेतकर्‍यांकडून गेल्या अनेक वर्षांपासून वजनावर दूध संकलित केले जाते. शासनाच्या सहनियंत्रक वैधमापन विभागाने दूध संस्थांना इलेक्ट्रॉनिक वजन काटे वापरण्यास बंदी घातली आहे. कोणताही द्रवपदार्थ लिटरमध्ये मोजावा, असा केंद्र शासनाचा नियम आहे. त्याप्रमाणे शेतकर्‍यांकडून दुधाची खरेदी करण्याच्या मागणीसाठी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांनी आंदोलन केले आहे. त्याची दखल घेऊन वैधमापन कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील दूध संस्थांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याच्याविरोधात शुक्रवारी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील दूध उत्पादक संघ व संस्थांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी आज दुपारपासून ताराबाई पार्क येथील ‘गोकुळ’च्या कार्यालयात दूध उत्पादक शेतकरी व कार्यकर्ते जमत होते. तेथून मोटारसायकल रॅलीने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात आले. सर्व कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात घुसल्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. सर्व कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर काढण्यात आले. त्यानंतर एका व्यापक शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी सुभेदार यांना निवेदन देण्यात आले.

शिष्टमंडळात खा. धनंजय महाडिक, गोकुळचे अध्यक्ष विश्‍वास पाटील, संचालक अरुण नरके, अरुण डोंगळे, राजेश पाटील, उदय पाटील, सत्यजित पाटील, दीपक पाटील, विलास कांबळे, रामराजे कुपेकर, पी. डी. धुंदरे, अनुराधा पाटील, जयश्री पाटील, चुयेकर, सांगली दूध उत्पादक संघटनांचे प्रतिनिधी किरीटभाई मेहता, श्रीपाद चितळे, शीतल थोटे, मोहन येडूरकर, गोकुळ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील, शामराव पाटील आदींचा समावेश होता.

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दूध संस्थांना वजनकाटे वापरास बंदी घालण्याच्या निर्णयाविरुद्ध गोकुळतर्फे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना निवेदन दिले आहे. दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघातर्फे नियंत्रक वैधमापन शास्त्र, मुंबई यांना दूध संकलनासाठी सध्याची इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याची पद्धत चालू ठेवण्याची विनंती केली आहे. त्यावेळी यासंदर्भात तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले होते. खा. धनंजय महाडिक यांनीही दिल्ली येथे वैधमापन संचालक दीक्षित यांची भेट घेऊन या प्रश्‍नासंदर्भात चर्चा केली होती. मे महिन्यात एन.डी.डी.बी.च्या अध्यक्षांची भेट घेऊन लिटरने दूध खरेदीची सक्ती रद्द करण्याबाबत केंद्र सरकारकडे विनंती करावी, असे निवेदन दिले होते. त्यानुसार एन.डी.डी.बी.ने दिल्ली व मुंबईच्या वैधमापन शास्त्र कार्यालयाला पत्र दिले. या पत्रात दुधाचे माप इलेक्ट्रॉनिक काट्याने केल्यास ते कायद्याच्या विरोधात असणार नाही, असे मत प्रदर्शित केले आहे. असे असतानाही कोल्हापुरातील वैधमापन कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी गडहिंग्लज दूध शीतकरण केंद्राला नोटीस देऊन दूध लिटरनेच घ्यावे अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी समज दिली. उपनियंत्रक वैधमापन शास्त्र, पुणे यांनी सहायक नियंत्रक वैधमापन शास्त्र  यांना ही बाब शासनाच्या विचाराधीन असल्यामुळे दूध संकलन केंद्रावर पुढील आदेश होईपर्यंत कारवाई करू नये, असे कळविले असतानासुद्धा गोकुळच्या शीतकरण केंद्रावर कारवाई करण्यात आली. तसेच शिये येथील श्री कामधेनू महिला सहकारी दूध संस्थेवर धाड टाकून संस्थेचा वजनकाटा जप्त केल्याने येथील संकलन थांबले आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात 35 लाख लिटरपर्यंत सहकारी व खासगी क्षेत्राचे दूध संकलन होते. ते लिटर पद्धतीने घेणे आवश्यक आहे. तरी याबाबत आपण लक्ष घालून दूध उत्पादकांना न्याय द्यावा.

निवेदन स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी सुभेदार यांनी वैधमापन अधिकारी नरेंद्र सिंह यांना वस्तुस्थिती मांडण्यास सांगितले. यावेळी सिंह यांनी केंद्र शासनाचा द्रवपदार्थ लिटरमध्ये मोजण्याचा नियम आहे. त्यानुसार दुधाची खरेदी करावी, यासाठी शिवसेना आदी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. कार्यालयाची मोडतोडही केली आहे. त्यामुळे नियमाची अंमलबजावणी सुरू केली असल्याचे सांगितले.
यावर जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, आता काय कराचये तुम्हीच सांगा. तेव्हा खा. धनंजय महाडिक म्हणाले, कोणतरी आंदोलन करते म्हणून कारवाई करत असाल, तर हे योग्य नाही. आम्हीही आंदोलन करतो. रस्त्यावर उतरत कारवाईला विरोध करतो, हे चालेल काय? लिटरने दूध घेणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. देशात कुठेही लिटरने दूध संकलित केले जात नाही. शिवाय यासंदर्भात कोणाची तक्रारही नाही. त्यामुळे लिटरने दूध घेण्याची सक्ती केल्यास पश्‍चिम महाराष्ट्रातील दूध संस्था दूध संकलन बंद ठेवतील. यात दूध उत्पादक शेतकर्‍यांचेदेखील नुकसान होणार आहे. दूध संकलन बंद केल्यानंतर उद्भवणार्‍या परिस्थितीस शासन जबाबदार राहील.

गोकुळचे अध्यक्ष विश्‍वास पाटील म्हणाले, लिटरवर दूध संकलन करताना खूप वेळ लागतो. त्यामुळे दूध वजनावरच खरेदी करण्याची पद्धत सुरू ठेवावी. कारवाई करण्यासाठी जर अधिकारी गावात आले, तर त्यांचे काय करायचे ते आम्ही पाहून घेऊ.

यावर जिल्हाधिकारी सुभेदार यांनी, यामध्ये दोन्हीकडून अधिकार्‍यांवर दबाव असेल, तर अधिकार्‍यांनी काय करायचे, असा सवाल उपस्थित केला. वसंत खाडे यांनी, लिटरचे प्रमाण आणि किलो यांची सांगड घालावी; पण दुधाचे संकलन वजनावरच करावे, अशी मागणी केली.

गोकुळचे जनरल मॅनेजर आर. सी. शहा यांनीही, गेल्या कित्येक वर्षापासून गोकुळ वजनावर दूध घेत आहे. मात्र, एकाही शेतकर्‍याची तक्रार नाही. असे असताना लिटरवर दूध घेण्याची सक्ती करणे योग्य नाही, असे सांगितले. अरुण नरके यांनी, यासंदर्भात संयुक्त समिती स्थापन करून त्यांची बैठक घ्यावी, तोपर्यंत ही कारवाई थांबवावी, अशी मागणी केली.