Sun, May 26, 2019 19:17होमपेज › Kolhapur › आजऱ्या तालुक्यातील  14 शाळांतील 29 वर्गखोल्या धोकादायक

आजऱ्या तालुक्यातील  14 शाळांतील 29 वर्गखोल्या धोकादायक

Published On: Mar 16 2018 12:45AM | Last Updated: Mar 15 2018 11:01PMआजरा : प्रतिनिधी

तालुक्यातील 14 शाळांमधील एकूण 29 वर्गखोल्या धोकादायक स्थितीत असून जिल्हा परिषद शाळाच्यांही खोल्यांचा समावेश धोकादायक वर्गखोल्यांच्या यादीमध्ये करण्यात आला आहे. या वर्गखोल्या जरी धोकादायक अशा जाहीर झाल्या असल्या तरीही अद्याप या शाळा खोल्यांकरिता पुरेसा निधी उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे हा निधी लवकर मंजूर न झाल्यास आगामी शैक्षणिक वर्षात शिक्षकांसह मुलांना धोकादायक स्थितीतच शालेय कामकाजाला सामोरे जावे लागणार आहे.

धोकादायक शाळांमध्ये विद्यामंदिर मेंढोलीच्या दोन वर्गखोल्या, विद्या मंदिर किणेची एक वर्गखोली, विद्यामंदिर साळगावची एक वर्गखोली, विद्यामंदिर पेरणोलीच्या चार वर्ग खोल्या, विद्यामंदिर सोहाळेची एक वर्गखोली, विद्यामंदिर कासार कांडगावच्या तीन वर्गखोल्या, विद्यामंदिर चाफवडेच्या चार वर्गखोल्या, विद्यामंदिर मेढेवाडीच्या दोन वर्गखोल्या, विद्यामंदिर शेळपच्या दोन वर्गखोल्या, विद्यामंदिर चितळेच्या दोन वर्गखोल्या, विद्यामंदिर घाटकरवाडीच्या दोन वर्गखोल्या, विद्यामंदिर सुळेरानच्या दोन वर्गखोल्या विद्यामंदिर हाळोलीच्या दोन वर्गखोल्या, विद्यामंदिर लाटगावच्या एका वर्गखोलीचा समावेश आहे. 

गेल्या दोन वर्षांपासून या धोकादायक इमारतींच्या बांधकामाकरिता निधीसाठी स्थानिक पातळीवरून पाठपुरावा सुरू आहे. तरीदेखील अद्याप निधी मंजूर न झाल्याने शेळप, हाळोली, लाटगाव यासारख्या गावांनी 14 व्या वित आयोगासह इतर स्त्रोत वापरून शक्य तितक्या वर्ग खोल्यांची दुरुस्ती स्वतःहून सुरू केली आहे. सर्व शिक्षा अभियान, जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन मंडळ यांच्याकडून हा निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे.

येत्या महिनाभरात हा निधी मंजूर झाल्यास पुढील वर्षाच्या शैक्षणिक सुरुवातीपूर्वी संबंधित वर्ग खोल्यांची दुरुस्ती व आवश्यक तेथे बांधकाम करून घेणे शक्य होणार आहे. जर वेळेत निधी मिळाला नाही तर पुढील वर्षी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना धोकादायक स्थितीत असलेल्या या शाळांच्या वर्गखोल्यांमध्येच शिक्षण घ्यावे लागणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी यांचा पाठपुरावा वरिष्ठ पातळीवर करून हा निधी वेळेत मंजूर करून आणणे आजच्या स्थितीला आवश्यक ठरत आहे.