Sun, Jun 16, 2019 12:19
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › जिल्ह्यातील २४ यात्रास्थळांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

जिल्ह्यातील २४ यात्रास्थळांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 22 2017 12:18AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 24 यात्रास्थळांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीने जिल्हा वार्षिक योजना ‘क’ वर्ग यात्रास्थळ विकास कार्यक्रमांतर्गत ही मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सर्वाधिक 7 यात्रास्थळांचा यामध्ये समावेश आहे. जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिल्याने या यात्रास्थळांना जिल्हा परिषदेकडून निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरवर्षी एक लाखापेक्षा अधिक भाविक भेट देणार्‍या यात्रास्थळांचा ‘क’ वर्गात समावेश करण्यात येतो. यावर्षी दाखल झालेल्या प्रस्तावांतून 24 मंदिरांचा ‘क’ वर्ग यात्रास्थळात समावेश करण्यात आला आहे. यात्रास्थळात समावेश करण्यात आलेल्या या मंदिरांना दरवर्षी 1 लाखापासून ते अगदी 5 लाखांपर्यंत भाविकांनी भेट दिल्याचे प्रस्तावासमवेत सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. या मंदिरांना गेल्या वर्षभरात एकूण 42 लाखांवर भाविकांनी भेट दिली असल्याचे या अहवालावरून स्पष्ट होत आहे.जिल्हा नियोजन समितीच्या 7 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत 17, तर दि. 6 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत 7 अशा एकूण 24 यात्रास्थळांना ‘क’ वर्ग दर्जा देण्यात आला. सहाच तालुक्यांतील यात्रास्थळांना मंजुरी देण्यात आली. 

पन्हाळा तालुक्यातील 6 मंदिरांचा समावेश आहे. हातकणंगले व करवीर तालुक्यातील प्रत्येकी 2 मंदिरांचा समावेश आहे. कागलमधील 2 तर शाहूवाडीतील 5 मंदिराचा समावेश आहे. यावर्षी ‘क’ वर्ग यात्रास्थळ म्हणून मान्यता दिलेली मंदिरे अशी-करवीर-हनुमान मंदिर बेले, श्री विठ्ठलाई मंदिर खंटागळे, कागल-अंबाबाई मंदिर व्हनाळी, भैरवनाथ मंदिर मौजे वडगाव, हातकणंगले-बिरदेव मंदिर रेंदाळ, हनुमान मंदिर सावर्डे, शाहूवाडी-महादेव मंदिर साळशी, संभय्या मंदिर कांडवण, भैरवनाथ मंदिर थावडे, मल्हारी मंदिर, मालेवाडी, महादेव मंदिर बांबवडे, पन्हाळा-ज्ञानेश्‍वर माऊली मंदिर कोडोली, जोर्तिलिंग मंदिर करंजफेण, तुंमजाई मंदिर सावर्डे तर्फे असंडोली, भैरोबा नागोबा मंदिर महाडिकवाडी, महादेव मंदिर काटेभोगाव, राधानगरी-विठ्ठलाई मंदिर सरवडे, संत बाळूमामा मंदिर आवळी बुद्रुक, स्वामी देवालय, बारडवाडी, जोजिर्लिंग मंदिर म्हासुर्ली, नागनाथ मंदिर माजगाव, श्री विठ्ठलाई मंदिर आणि महादेव व जोर्तिलिंग मंदिर.