Tue, May 21, 2019 13:15होमपेज › Kolhapur › मिणचे येथे दोन गटांत हाणामारी; तिघे जखमी

मिणचे येथे दोन गटांत हाणामारी; तिघे जखमी

Published On: Aug 25 2018 1:14AM | Last Updated: Aug 25 2018 1:03AMपेठवडगाव : वार्ताहर

हातकणंगले तालुक्यातील मिणचे येथे वर्चस्व वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी करून अक्षरश: राडा घातला. या हाणामारीत धारदार चाकूचा वार केल्याने राकेश नंदकुमार वायदंडे (वय 25) हा गंभीर जखमी झाला आहे.तर पृथ्वीराज दगडू घाडगे (25) व  अनिकेत शंकरसदा काळे (23, सर्व रा. मिणचे, मांतग वसाहत) हे  दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.

दरम्यान, राकेश वायदंडे याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यासह अन्य जखमींवर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने मिणचे गावात तणावाचे वातावरण पसरले असून पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून मिणचे गावचे ग्रामदैवत हजरत पीर यांचा उरूस सुरू आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, 22 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत चौकात मनोरंजनाचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमातील गाण्यांवर डान्स करण्यासाठी दोन तरुण गटात ईर्षा सुरू होती. यावेळी या दोन गटात बाचाबाची झाली. एकमेकांवर खुर्च्या फेकाफेकी चा प्रकार झाल्याने संयोजकांनी कार्यकम बंद करण्यात आला.

दरम्यान,  गेली दोन दिवस हा वाद धुमसत होता. आज शुक्रवारी सायंकाळी पाऊणेपाच वाजता राकेश नंदकुमार वायदंडे, पृथ्वीराज दगडू घाडगे, अनिकेत शंकरसदा काळे हे मोटारसायकलवरून ग्रामपंचायत चौकात आले असल्याची माहिती नेताजी वाडकर याच्या ग्रुपला मिळाली.परवा घडलेल्या घटनेचा जाब विचारण्यासाठी नेताजी वाडकर याच्या सोबत अन्य संतप्त तरुण ग्रामपंचायत चौकात आली. यावेळी चौकात उभारलेल्या राकेश वायदंडे आणि त्याच्यासोबत असलेल्या मित्रांना जाब विचारला. ग्रुपच्या काही तरुणांनी या तिघांवर गुप्ती, चाकू या धारधार हत्यारांनी सपासप वार केले. यामध्ये राकेश याच्या पोटात एकाच ठिकाणी तीन वर्मी घाव बसल्याने गंभीर जखमी झाला, तर पृथ्वीराज व अनिकेत यांच्या हातावर, पाठीवर, पोटावर चाकूचे वार झाल्याने तिघे जखमी झाले. जखमींना सीपीआर रुग्णालयात उपचारास हलविण्यात आले.

अचानक झालेल्या या घटनेने जत्रेसाठी आलेल्या नागरिकांची धावपळ उडाली. विविध दुकाने बंद करण्यात आली. ही बातमी वार्‍यासारखी गावभर पसरल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. तत्काळ वडगाव पोलिस ठाण्याचे पो. नि. अशोक पवार यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. शांततेचे आवाहन केले. सीसीटीव्ही कॅमेर्‍यातून प्रत्यक्ष हाणामारी करणार्‍या तरुणांची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिराप्रयत्न सुरू होते. याची नोंद वडगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.तपास पो. नि. अशोक पवार हे करीत आहेत.