Tue, Jul 23, 2019 10:33होमपेज › Kolhapur › शहराला डेंग्यूचा विळखा

शहराला डेंग्यूचा विळखा

Published On: Jul 11 2018 1:36AM | Last Updated: Jul 10 2018 11:24PMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर शहरात सोमवारी डेंग्यूचे 46 रुग्ण आढळल्यानंतर मंगळवारी पुन्हा 20 रुग्ण सापडले. त्यामुळे गेल्या दहा दिवसांत तब्बल 250 जणांना डेंग्यू झाला आहे. त्यांच्यावर सीपीआर व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परिणामी शहरात डेंग्यूचा विळखा वाढत असल्याचे स्पष्ट होते. महापालिका प्रशासनाने मंगळवारी 419 घरांचे सर्वेक्षण केले. 99 ठिकाणी साठलेल्या पाण्यात डेंग्यू डासांच्या अळ्या सापडल्या. फुलेवाडी, शनिवार पेठ, कदमवाडी, कावळा नाका परिसर, राजेंद्रनगर, संभाजीनगर, सदर बाजार, शिवाजी पेठ, नागाळा पार्क आदींसह इतर ठिकाणी अळ्या सापडल्या. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.  

जानेवारीपासून शहरात डेंग्यूने थैमान घातले आहे. गेल्या सहा महिन्यांत तब्बल पाचशेच्यावर जणांवर रुग्णांना डेंग्यू झाला. महापालिकेच्या वतीने 22 मे पासून शहरातील विविध भागात पथके तैनात करून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. पथकातील कर्मचारी शहरभर फिरून साठलेल्या पाण्यातील डेंग्यू डासांच्या अळ्या नष्ट करत आहेत. आतापर्यंत महापालिका प्रशासनाच्या वीने 1 लाख, 31 हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. महापालिकेच्या वतीने सर्वेक्षण सुरू असले तरीही शहरात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचा फैलाव होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने शहरात रोज डासप्रतिबंधक धूर फवारणी, औषध फवारणी करावी, अशी मागणी होत आहे. मात्र, महापालिकेची यंत्रणा कमी पडल्यामुळे शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. 

डेंग्यू डास उत्पत्तीची प्रमुख ठिकाणे 

साठविलेले स्वच्छ पाणी उदा. पाण्याची टाकी, रांजण, वॉटर कूलरमधील पाणी, भंगार वस्तू, नारळाच्या करवंट्या, टायर, डबे, रिकाम्या कुंड्या, बादल्या, बांधकामावरील पाण्याचे उघडे साठे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना 

तापाची साथ असल्यास त्वरित वैद्यकीय अधिकार्‍यांंना कळवावे.
धूर फवारणी करणे.
मोठ्या पाणीसाठ्यामध्ये 
गप्पी मासे सोडणे.
कीटकनाशकभारीत मच्छरदाण्या वापरणे.
डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे
पाणीसाठे आठवड्यातून एकदा रिकामे करून स्वच्छ करणे.
झोपताना संपूर्ण अंग झाकेल असे कपडे वापरणे 
जलद ताप सर्वेक्षण करून प्रयोगशाळेतून खात्री करून घेणे 

डेंग्यू डासाची ओळख 

डेंग्यू हा आजार एक प्रकारच्या विषाणूमुळे होतो. डासाच्या तापाचा प्रसार, एडिस इजिप्‍ती या डासांच्या मादीमार्फत होतो. या डासाच्या पायावर पांढरे चट्टे असतात म्हणून त्याला ‘टायगर मॉस्क्युटो’ म्हणतात. हे डास दिवसा चावतात.

डेंग्यू झाल्याचे कसे ओळखावे? 

तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायुदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे. दुसर्‍या दिवसापासून तीव्र डोळेदुखी, अशक्‍तपणा, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे, ताप कमी-जास्त होणे, अंगावर पुरळ येणे, रक्‍तस्त्रावयुक्‍त डेंग्यू ताप तसेच त्वचेखाली रक्‍तस्त्राव, नाकाकडून रक्‍तस्त्राव, रक्‍ताची उलटी, रक्‍तमिश्रित किंवा काळसर रंगाचे शौचास होणे.