Sun, May 26, 2019 09:15होमपेज › Kolhapur › जबरी चोर्‍यांमुळे नागरिक भयभीत

जबरी चोर्‍यांमुळे नागरिक भयभीत

Published On: Jul 11 2018 1:36AM | Last Updated: Jul 10 2018 11:21PMकोल्हापूर : गौरव डोंगरे 

धूम स्टाईलने महिलांचे दागिने हिसकावणे, पाठलाग करून रक्‍कम लुटण्याच्या घटना भरवस्तीत घडू लागल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण आहे. मागील पाच महिन्यांत चोरट्यांनी सुमारे 1 कोटीचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले आहे. जानेवारी ते मे महिन्यादरम्यान जबरी चोरीच्या 55 घटना घडल्या असून, त्यातील 35 उघडकीस आल्या आहेत, तर सोनसाखळी चोरीच्या 26 घटनांतील केवळ 9 गुन्ह्यांची उकल होऊ शकली आहे. शहरालगतची साने गुरुजी वसाहत, रिंग रोड, कसबा बावडा, कळंबा, आपटेनगर देवकर पाणंद,  साळोखेनगर, जाधववाडी, पाटोळेवाडी, कसबा बावडा, पाचगाव, मोरेवाडी, आर. के. नगर ही सोनसाखळी चोरट्यांची नेहमीची ठिकाणे आहेत. तर मध्यवर्ती बसस्थानक हा चोरट्यांचा मुख्य केंद्र ठरले आहे. बसमध्ये बसताना पर्स, दागिने चोरणार्‍या चोरट्यांचा मोठा फटका प्रवाशांना बसला आहे. 

पोलिस असल्याची बतावणी 

पुढे दंगा झाला आहे, तुमचे दागिने काढून रूमालात ठेवा. मी पोलिस आहे, आमचे साहेब पुढे थांबले आहेत, अशी बतावणी करून लूटमारीच्या लागोपाठ घटना मार्च व एप्रिल महिन्यांत घडलेल्या आहेत.
राजारामपुरी, संभाजीनगर, वडगाव, कागल परिसरात तोतया पोलिसाने वृद्धांना लुबाडले. 

पेट्रोल मागण्याच्या बहाण्याने लुटले

वडगाव ते आष्टा रोडवर रात्री अपरात्री थांबून वाहनधारकांकडे पेट्रोल मागण्याच्या बहाण्याने लुटण्याचा प्रकार घडला होता.शंकर नामदेव लोंढे (वय 46, रा. मिणचे सावर्डे, ता. हातकणंगले) व्यापार्‍याला मारहाण करुन 59 हजार रुपये अज्ञातांनी हिसकावून घेण्यात आले होते. 

मुंबईच्या टोळीकडून लुट

मुंबईतील टोळीने पाळत ठेवून गुजरीत सराफाला लुटले. 7 फेब्रुवारीला पहाटे सहाच्या सुमारात गुजरीमध्ये सराफाला मारहाण करुन 34 लाखांचे दागिने लंपास करण्यात आले होते. जयसिंगपूरनजीक 23 जानेवारीला सोमनाथ झिंगुर्टे या व्यापार्‍याला तिघा अज्ञातांनी लुटले. त्यांच्याकडील 2 लाख 24 हजारांची रक्‍कम चोरट्यांनी लंपास केली.  तर एप्रिल महिन्यात करुळ घाटात आंबा व्यापार्‍याचे 8 लाख रुपये लुटण्यात आले होते. 

जोतिबा यात्रेत पाच लाखांचा डल्‍ला

एप्रिल महिन्यात पार पडलेल्या जोतिबा चैत्री यात्रेत भुरट्या चोरांचा सुळसुळाट होता. भाविकांचे पाच लाखांचे दागिने चोरट्यांनी हिसडा मारुन पळविले. 

चोरट्यांची टोळी जेरबंद

पन्हाळा, गिरोली, वडगावनजीक कोयत्याचा धाक दाखवून लोकांना लुटणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. 

चोरट्यांमुळे पर्यटकही त्रस्त

अंबाबाई देवीच्या दर्शनाला येणार्‍या भाविकांनाही चोरट्यांचा भयंकर त्रास सहन करावा लागतो. अंबाबाई मंदिर, ताराबाई रोड, महाद्वार रोड या परिसरात गर्दीचा फायदा घेत पर्स लंपास करणारी टोळी कार्यरत आहे. सुट्टीच्या कालावधीत गर्दी वाढल्याने या चोरट्यांचा उपद्रवही वाढला आहे. महाद्वार रोडवर खरेदीसाठी फिरणार्‍या अनेकांना याचा फटका बसत आहे. गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिस, महिला पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.