होमपेज › Kolhapur › ख्रिसमसनिमित्त बाजार फुलला 

ख्रिसमसनिमित्त बाजार फुलला 

Published On: Dec 16 2017 2:06AM | Last Updated: Dec 15 2017 11:46PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाताळनिमित्त विविध वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. या सणाची ख्रिस्ती बांधवांचीही जय्यत तयारी सुरू झाली आहे. महाद्वार रोड, पापाची तिकटी, राजारामपुरी, शाहूपुरीसह शहरांतील मॉलमध्ये विविध प्रकारच्या वस्तू खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली. सांता टोपी, बेल्स, कॅण्डल, ख्रिसमस ट्री, गिफ्ट पॅकेजसह सजावटीच्या साहित्यांना मोठी मागणी आहे. 

पापाची तिकटीसह शहरातील विविध भागांत सांता टोपी विक्रीची दुकाने गेल्या काही दिवसांपासून विक्रेत्यांनी थाटली आहेत. आकर्षक अशा विविध प्रकारचे कॅण्डल,डेकोरेटिव्ह कॅण्डल, सुवासिक, चंदनयुक्त कॅण्डल, जेलिटेप स्टॅण्ड विथ कॅण्डल, यासह हार्डशेप आणि लायटिंग कॅडल बाजारात उपलब्ध झाले आहेत.ख्रिसमसमध्ये कॅण्डलला विशेष महत्त्व असल्याने त्यास विशेष मागणी आहे. 50 रुपयांपासून 500 रुपयांपेक्षा अधिक किमतीत हे आकर्षक कॅण्डल मिळत आहेत. याशिवाय ख्रिसमस ट्रीला मोठी मागणी आहे. मदर मेरी, जीझन, सांताक्लॉज अशा विविध आकाराच्या आकर्षक मूर्तींना चांगली मागणी आहे. बच्चे कंपनीत सांताक्लॉजचे खास आकर्षक असून चॉकलेट, गिफ्ट घेऊन येणार्‍या सांताक्लॉजचे आकर्षक मुखवटे, टोपी यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.

यंदा दोरीवर चालणारा, घोडागाडीवर स्वार असलेला, तसेच दोरीवरून सायकल चालविणारा सांताक्लॉज बाजारात दाखल झाले आहेत. यासह ग्रिटिंग कार्ड, सजावटीचे साहित्य, गोल्डन बेल्ससह विविध प्रकारच्या गिफ्टस् खरेदीकडे ग्राहकांचा ओढा आहे. ख्रिसमस पोस्टर्स 30 रुपयांपासून 300 रुपयांपर्यत, बेल्स् 20 ते 1200 रु., ट्री - 50 ते 4 हजार रुपयांपर्यंत, बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय लायटिंग, साधे आणि म्युझिकल सांताक्लॉज तसेच टॉईजमधील सांताक्लॉजला विशेष मागणी आहे. सांताच्या टोपीमध्येही वेनी, लायटिंग , गोंंडा कॅप असे प्रकार असून सांताची पोटली आणि सॉक्सलाही ग्राहकांची पसंती लाभत आहे. लहान मुलांचा सांताक्लॉज सारखा ड्रेस 150 रुपयांपासून 600 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. 

चॉकलेट, केकला मागणी

नाताळनिमित्त प्रियजनांना भेटवस्तू देण्याकरिता विविध प्रकारच्या चवीचे तसेच आकर्षक पॅकिंग केलेले चॉकलेटस् बाजारात उपलब्ध असून त्याची मागणी वाढली आहे. तसेच ड्रायफ्रुटस्, मिठाईबरोबर केकला चांगली मागणी आहे.

गव्हाण सजावटीला महत्त्व

प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्म गायीच्या गोठ्यात झाला. तशी गव्हाण देखाव्यांच्या माध्यमातून उभारण्याचा प्रयत्न केला जातो. चर्चसह ख्रिस्ती बांधवही आपल्या घरी गव्हाण देखावा तयार करतात.