कोल्हापूर : राजेंद्र जोशी
देशातील कर्करोगावर औषध निर्माण करणार्या कंपन्यांसाठी एक मोठे दिलासादायक वृत्त आहे. भारत आणि चीन यांच्या दरम्यान नुकत्याच झालेल्या व्यापारी करारानुसार भारतातून निर्यात होणार्या कर्करोगाच्या औषधांवरील आयात शुल्कात चीन सरकार मोठ्या प्रमाणात कपात करण्याच्या तयारीत आहे. यामुळे भारतीय औषध कंपन्यांना चीनमधील औषधांच्या बाजारपेठेचे दरवाजे खुले होण्याच्या मार्गावर आहेत. याचा मोठा लाभ भारतीय कंपन्यांना मिळू शकतो.
चीनमध्ये अस्तित्वात असलेल्या आयात शुल्काच्या रचनेमुळे भारतातून चीनमध्ये 8 हजार 500 डॉलर्सची निर्यात होणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र 5 हजार 100 डॉलर्सच्या निर्यातीची तूट आहे. ही तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने चीनला आयटी व औषध क्षेत्रातील उत्पादनांना चीनची बाजारपेठ खुली करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाची दखल घेऊन नुकताच भारत आणि चीन यांच्यादरम्यान एक करार करण्यात आला. या करारामुळे कर्करोगावरील औषधांना लवकरच चीनच्या बाजारपेठेचे दरवाजे खुले होतील, अशी माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
भारतीय औषध कंपन्यांची उत्पादने विकण्याची थेट अनुमती चीन सरकारकडून मिळण्याची प्रतीक्षा भारतीय औषध उद्योग करत आहे. कारण चीनमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार चीनच्या बाजारपेठेत दाखल होणार्या कंपनीला चीन सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाचा परवाना घ्यावा लागतो. या परवान्यासाठी अनेक जाचक अटी आहेत. या अटी दूर करून चीन सरकारने एक पाऊल पुढे टाकले तर भारतीय औषध उद्योगाला एका चांगल्या संधीला गवसणी घालता येऊ शकते.