चीनने लपवले, अन् जग कोरोना खाईत लोटले!

Last Updated: Jun 07 2020 1:05AM
Responsive image


कोल्हापूर : पुढारी डेस्क

जागतिक आरोग्य संघटनेने अगदी सुुुुरुवातीच्या दिवसांत कोरोना संदर्भातील माहिती मिळविण्यासाठी चीनचा पिच्छा पुरविला होता. पण चीनने दाद दिली नाही. ही माहिती मिळावी म्हणून आरोग्य संघटनेने संघर्ष म्हणावा इतपत प्रयत्न केला; पण चीनने कोरोनाबाबतची कुठलीही नेमकी माहिती आरोग्य संघटनेला दिली नाही. ही बाब आरोग्य संघटनेच्या एका अंतर्गत बैठकीतील चर्चेच्या रेकॉर्डिंगवरून समोर आली आहे.

‘असोसिएटेड प्रेस’कडे हे रेकॉर्डिंग उपलब्ध झाले असून, त्यातून संघटनेचे वरिष्ठ अधिकारी चीन अजिबात माहिती देत नसल्याबद्दल चीनविरोधात ओरड करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपानसह जगभरातील काही देशांनी कोरोनाच्या उद्भवाचा नेमका वेध घेण्यासाठी म्हणून चीनकडे अन्य देशांतील शास्त्रज्ञांना चीनमध्ये येऊन संशोधनासाठी परवानगी मागितली; पण चीनने या मागणीवर सातत्याने नकार दिला. अखेर जागतिक आरोग्य संसदेतही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपानसह जगातील 173 वर देशांनी चीनने अन्य देशांतील शास्त्रज्ञांना चीनमध्ये दाखल होऊन संशोधनाची परवानगी द्यावी म्हणून दबाव आणला. तेव्हा कुठे बीजिंगमध्ये झालेल्या चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या संसदेत ही मागणी मान्य करण्याची तयारी चीनने दर्शविली. लगोलग तीन-चार दिवसांनीच वुहान विषाणू विज्ञान प्रयोगशाळेच्या हवाल्याने चीनमधून वृत्त आले की, कोरोना हा विषाणू वुहानमध्ये पहिल्यांदा उद्भवला, असे काहीही नाही. जगातील अन्य देशांतही तो यापूर्वीच उद्भवलेला आहे. थोडक्यात जगातील अन्य देशांचे शास्त्रज्ञ कोरोना उद्भवाचा शोध घेण्यासाठी चीनमध्ये येतील न येतील, त्यापूर्वीच असे घूमजाव चीनने केलेले आहे. चीन कोरोनासंदर्भात लागोपाठ खोटे बोलत आहे, माहिती दडवत आहे आणि घूमजावही करत आहे. दुसरीकडे कोरोना उद्भवाच्या विषयावरून जगाचे लक्ष वळविण्यासाठी कधी भारतातील लडाखमध्ये सैन्याची जमवाजमव करून भारतावर दहशत निर्माण करण्याचे काम करत आहे, कधी तैवान गिळंकृत करण्याची भाषा करत आहे. 

दुसरीकडे कोरोनासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने चीनवर उधळलेली कौतुकाची मुक्‍ताफळे किती भंपक आहे, हे सिद्ध झाले आहे. चीनने योग्य ती माहिती योग्यवेळी दिल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी चीनला धन्यवाद दिले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी चीनचे केलेले हे अभिनंदन आणि चीनला दिलेले हे धन्यवाद किती बेगडी आहेत, हे असोसिएटेड प्रेसकडे उपलब्ध झालेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीच्या रेकाँर्डिंगवरूनच सिद्ध झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेची ही बैठक 6 जानेवारी रोजी झाली होती. विषाणूमुळे उर्वरित जगाला किती जोखीम आहे, याचे मूल्यमापन करायचे तर डेटा आवश्यक आहे. मात्र चीन तो उपलब्ध करून देत नसल्याबद्दल या रेकॉर्डिंगमध्ये हे अधिकारी तक्रारींचा सूर आळवत आहेत. कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे, हे सांगायला चीनने 20 जानेवारीपर्यंत वेळ घेतला. तोवर चीन कोरोनाबद्दल जवळपास मूग गिळून होते. 20 जानेवारीनंतर जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करायला जागतिक आरोग्य संघटनेने आणखी 10 दिवस घेतले. 

असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार अत्यंत जुजबी आणि किमान माहिती आम्हाला मिळाली, तेवढ्या आधारावर हाती असलेल्या अत्यल्प वेळेत उर्वरित जगात संसर्ग होऊ नये म्हणून नेमकेपणाने योजना आखणे आम्हाला शक्य झाले नाही, असे साथरोग तज्ज्ञ तसेच आरोग्य संघटनेच्या कोरोना तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन केर्खोव्ह यांचे या रेकाँर्डिंगनुसार म्हणणे होते. 

उद्भव एकटाच का शोधतोय चीन?

जगभरात पावणेचार लाख लोकांच्या मृत्यूचे कारण ठरलेल्या आणि 60 लाखांवर लोकांना संत्रस्त करून सोडणार्‍या कोरोना विषाणूच्या उद्भवाचा शोध घेण्यासाठी स्वत:ची स्वतंत्र यंत्रणा चीनने कोणत्या तोंडाने स्थापन केली? उर्वरित देशांतील संशोधकांसाठी चीन आपले दरवाजे का खुले करत नाही?

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस अ‍ॅधोनॉम गॅब्रिएसिस सारखे कोरोनासंदर्भात चीनवर कौतुकाचा वर्षाव करण्यावरून जगभरातील अनेक देशांच्या विशेषत: अमेरिकेच्या टीकेचा विषय बनले आहेत. या रेकॉर्डिंगबद्दल असोसिएटेड प्रेसने प्रतिक्रिया विचारली असता आरोग्य संघटनेच्या चीनमधील कार्यालयाने कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

चीनने दडपून टाकला संशोधकांचा आवाज

वुहानमधील डॉ. ली वेनलियांग यांनी जगाला पहिल्यांदा कोरोना विषाणूबद्दल माहिती दिली. त्यांचा आवाज चीन सरकारकडून बंद करण्यात आला. डॉ. ली वेनलियांग स्वत: कोरोनाबाधित झाले आणि यात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर वुहान मध्यवर्ती रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाच्या संचालिका डॉ. आई फेन यांनी 30 डिसेंबरला आय चॅटवर (चीनमधील व्हॉटस्अ‍ॅप) कोरोना विषाणूचे नेमके निदान करणारी माहिती शेअर केली. माणसाकडून माणसांना हा आजार संक्रमित होतो, असे डॉ. फेन यांनी यात म्हटले होते. हॉस्पिटल व्यवस्थापनासह चीन सरकारकडूनही डॉ. फेन यांचा आवाज दाबण्यात आला. डॉ. आई फेन यांचा आवाज चीन सरकारने तेव्हा दाबला नसता तर पुढे जगभरात झालेली प्रचंड मनुष्यहानी टाळता आली असती. 

आजाराचे कारण सांगितले; पण स्वरूप नाही

महत्त्वाचे म्हणजे चीनच्या सरकारी माध्यमातूनही 9 जानेवारी रोजी आजाराचे कारण कोरोना विषाणू असल्याचे सांगण्यात आले होते; पण हा विषाणू संसर्गजन्य आहे, हे दडविण्यात आले होते. यानंतर जवळपास 2 आठवड्यांनी विषाणू संसर्गजन्य असल्याचे चिनी माध्यमांनी जाहीर केले, वुहानमधील रुग्णालये तुडुंब भरली आहेत, हे जगाला कळल्यानंतर... पण दरम्यान चीनची अभेद्य भिंत ओलांडून कोरोना जगभरात दाखल झाला होता.