Wed, Apr 24, 2019 11:32होमपेज › Kolhapur › अपेक्षा, दडपणामुळे बालपण हरवतंय!

अपेक्षा, दडपणामुळे बालपण हरवतंय!

Published On: Jan 08 2018 1:13AM | Last Updated: Jan 07 2018 11:13PM

बुकमार्क करा
कोवाड : वार्ताहर

समाजातील घडणार्‍या घटनांचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होतो. त्या भावना व्यक्‍त करण्यासाठी कृती म्हणजेच साहित्य असून, पालकांच्या अपेक्षा आणि शिक्षकांचे दडपण यामध्ये मुलांचे बालपण हरवत असल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांनी व्यक्‍त केली. 

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई व भाषा विकास संशोधन संस्था हलकर्णी यांच्या संयुक्‍त विद्यमाने मजरे कार्वे (ता. चंदगड) येथे आयोजित बालकुमार साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

प्रास्ताविक भाषा विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले. स्वागत एकनाथ पाटील यांनी केले. अवचट म्हणाले, चांगले लिहिण्यासाठी स्वतःला चांगल्या पद्धतीने जगता आले पाहिजे. सुशिक्षित व शहरी भागातील मानवाच्या मनातील संवेदना हरवत असल्याचे सांगून, आदिवासी भागात मात्र अजूनही एकमेकांना सहकार्य करून जगण्याची कला अस्तित्वात असल्याचे सांगितले. चांगले साहित्य मुलांनी वाचावे, असे आवाहन करून दिखाऊ संस्कृती व व्यसनांपासून बालकांनी दूर राहून चांगले मित्र व चांगली कला अत्मसात करावी, असा मंत्र बालकांना दिला.

संमेलनाचे उद्घाटन करताना प्रा. राजन गवस यांनी लहान वयातील मुलांचा खोडकरपणा हा बालकांच्या विकासातील महत्त्वाचा घटक असल्याचे सांगून, पालकांच्या अपेक्षा व शिक्षकांचे दडपण यामुळे मुलांचे बालपण हरवत चालल्याची खंत व्यक्‍त केली. यावेळी जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. राजन गवस यांचा सत्कार अनिल अवचट यांच्या हस्ते करण्यात आला.

दरम्यान, दै. ‘पुढारी’चे चंदगड तालुका प्रतिनिधी नारायण गडकरी यांनी लिहिलेल्या ‘पारगड’ या पुस्तकाचे प्रकाशन संमेलनाचे अध्यक्ष अनिल अवचट, प्रा. राजन गवस, भारत सासणे, ज्योतिराम कदम, विजयकुमार दळवी, सौ. सरपंच निशा बोकडे, उपसरपंच शिवाजी तुपारे यांच्या हस्ते झाले. 

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सकाळी 8 वाजता कार्वे गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. ग्रंथदिंडीचे उद्घाटन ‘गोकुळ’चे संचालक राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर ग्रंथदालनाचे उद्घाटन माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दुपारच्या सत्रात ज्येष्ठ कथाकार प्रा. आप्पासाहेब खोत यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथनाचा कार्यक्रम पार पडला. संध्याकाळी स्वरसंध्या हा कार्यक्रम झाला. सूत्रसंचालन मायाप्पा पाटील यांनी केले. आभार निवृत्ती गावडे यांनी मानले.