Sun, Jun 16, 2019 13:01
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › खेळ म्हणजे काय माहितच नाही!

खेळ म्हणजे काय माहितच नाही!

Published On: Jan 20 2018 1:39AM | Last Updated: Jan 20 2018 12:50AMकोल्हापूर : पूनम देशमुख 

सिग्नल , बसस्थानक, छोटी - मोठी हॉटेल्स, मंदिरे, वीटभट्ट्या अशा ठिकाणी सर्वसाधारणपणे एक गोष्ट नजरेस पडते ती म्हणजे बालमजुरी. गरिबी, अज्ञान, शिक्षणाचा अभाव, अशा विविध कारणांमुळे बालमजुरीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. केवळ बालमजुरी विरोध दिन साजरा करून हा प्रश्‍न निकालात निघणार नाही, त्याऐवजी गरिबांना सामाजिक सुरक्षा कशी देता येईल, त्यांचे जीवनमान आर्थिकदृष्ट्या कसे उंचावता येईल, याचाही विचार होणे आवश्यक आहे. 

बालपण म्हणजे खेळण्या- बागडण्याचे वय, या वयातच जीवनातील सगळ्याच चांगल्या गोष्टी पाहता येतात, अनुभवता येतात, नवे काही तरी जिज्ञासेने जाणून घेता येते. शिक्षण घेऊन पुढील आयुष्याची स्वप्न रंगवण्याचे वय, पण घरात अठराविश्‍व दारिद्य्र, वाढती महागाई, अज्ञान आणि पैशासाठी अनेक लहानग्यांना कामात जुंपल्याचे विदारक चित्र आजही दिसून येते. गरिबी अनेक सामाजिक समस्यांना जन्म देते, त्यापैकी एक म्हणजे बालमजुरी. प्रशासनातर्फे दरवर्षी बालमजुरांची सुटका होत असल्याचे दाखवण्यात येत असले तरी ती कारवाई केवळ बालमजुरीविरोधी दिनापुरतीच मर्यादित असल्याचे अनेकदा समोर आले आहे. 

बालमजुरीला कायद्याने बंदी आहे. बालमजुरी रोखण्यासाठीचे कायदे आहेत. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने अनेक मुलांना बालवयातच कामाला जुंपले जाते. बालमजुरी ही अनेकदा घरातल्या बेताच्या परिस्थितीमुळे ओढवली जाते. बालमजूर बाजारपेठा, हॉटेल्स, छोटे-मोठे कारखाने येथे प्रामुख्याने दिसतात; पण त्यांची सुटका करणारे कोणीच नसते. गरिबीमुळे मिळेल ते काम करण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो, लघुउद्योगांत, भंगार, देवळात, सिग्नलवर छोट्या-मोठ्या वस्तूंची विक्री करताना, प्लास्टिक आणि कागद गोळा करणारी मुले आहेत. ही कामे करून घेणारे त्यांना पुरेसा पैसाही दिला जात नाही. त्यातूनही त्यांचे शोषण केले जाते. शहरातही भवानी मंडप परिसर, महाद्वार रोड, बिंदू चौक, रंकाळा परिसर आदी ठिकाणांसह पर्यटनस्थळांवर बालमजुरांची गर्दी दिसते. छोट्या-मोठ्या वस्तूंची विक्री करताना, फुले विकताना, तर कोणी तरी क डेवरील लहान भावाला शांत करत त्याची भूक शमवण्यासाठी भिक मागताना दिसतात. अठराविश्‍व दारिद्य्रामुळे मुलींचे लग्नही अल्पवयात केले जाते. लग्नानंतरही गरिबी अशा मुलींच्या नशिबी मजुरीच येते. अगदी लहान वयातच न झेपणारी कष्टाची कामे, अस्वच्छतेची कामे आणि उपासमार यामुळे बालमजुरांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते अन् अनेकदा त्यातच त्यांना जीवही गमवावा लागतो.