Tue, Mar 19, 2019 09:17होमपेज › Kolhapur › दुचाकी धडकेत  बालकाचा मृत्यू

दुचाकी धडकेत  बालकाचा मृत्यू

Published On: Jul 03 2018 1:51AM | Last Updated: Jul 03 2018 1:29AMगडहिंग्लज : प्रतिनिधी

ट्रॅक्टरला ओव्हरटेक करून जाताना समोरून आलेल्या मोटारसायकलने मोपेडला जोराची धडक दिली. यात मोपेडवर मागे बसलेल्या सुजल सुनील मनवाडकर (वय 6, रा. सध्या डॉ. राजेंद्र प्रसाद रोड, गडहिंग्लज, मूळगाव किणी, ता. चंदगड) या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास येथील काळभैरव रोडवर ही घटना घडली.

आशा सुनील मनवाडकर या दोन महिन्यांपूर्वी दोन मुलांसह येथील डॉ. राजेंद्र प्रसाद रोडवरील साळोखे यांच्या घरी भाड्याने राहण्यास आल्या आहेत. त्यांचे पती लष्करात आहेत. दोन्ही मुले शेंद्री येथील शाळेत शिकतात. मोठा मुलगा आदित्य तिसरीत, तर लहान सुजल पहिलीत शिकत होता. सोमवारी सायंकाळी मोठ्या मुलाला आणण्यासाठी सौ. आशा या लहान मुलाला सोबत घेऊन मोपेडवरून (यूके 03 बी 2583) शेंद्रीच्या दिशेने जात होत्या.

गडहिंग्लज हायस्कूलच्या पुढे गेल्यानंतर खडी भरून जाणार्‍या ट्रॅक्टरला पास करून जात असताना समोरून आलेल्या मोटारसायकलने (एमएच 09 सीआर 6626) त्यांच्या मोपेडला धडक दिली. यात त्या रस्त्यावर जोरात आपटल्या.  मागे बसलेल्या सुजलच्या डोक्याला मार लागला. तत्काळ स्थानिक नागरिकांनी त्याला उपचारासाठी नेले. मात्र, त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी मोटारसायकलस्वार शुभम सर्जेराव साठे (रा. हसूर, ता. कागल) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.