Tue, Jul 23, 2019 18:48होमपेज › Kolhapur › बाल अस्थमात दहा वर्षांत दुपटीने वाढ

बाल अस्थमात दहा वर्षांत दुपटीने वाढ

Published On: May 01 2018 1:16AM | Last Updated: Apr 30 2018 11:11PMकोल्हापूर : पूनम देशमुख

बाल अस्थमाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या दहा वर्षांत बाल अस्थमाचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. वाढत्या प्रदूषणासोबत घरातील धूळ, झुरळ, धूम्रपान, फटाक्यांचा धूरही अस्थमा (दमा) होण्यास कारणीभूत ठरत आहे. अनुवांशिकता व वातावरणातील घटकांमुळे हा आजार होत असल्याचे समोर आले आहे. 

2020 पर्यंत भारतात अस्थमाचे सर्वाधिक रुग्ण असण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. दरवर्षी जगात 1 लाख 80 हजार अस्थमाग्रस्त मुले मृत्युमुखी पडतात. भारतात सध्या दीड ते दोन कोटी लोक अस्थमाचे रुग्ण आहेत. यात 5 ते 12 वर्षांच्या मुलांमध्ये 10 ते 15 टक्के प्रमाण आहे. जागतिक अस्थमा दिन ग्लोबल इनिशिएटिव्ह या संस्थेतर्फे दरवर्षी  मे महिन्यातील पहिल्या मंगळवारी साजरा केला जातो. या दिवशी अस्थमाबाबत जनजागृती केली जाते.  वाढती बांधकामे, घरातील भिंतीना लागलेली ओल, व्हेंटिलेशनचा अभाव, हवेतील प्रदूषण, वातावरणातील बदल व बदलत्या जीवनशैलीमुळे भारतात फुफ्फुसाचे आरोग्य बिघडण्याचे प्रमाण वाढते आहे.  परिणामी 5 ते 12 वयोगटातील बालकांमध्ये दम्याचे विकास वाढत आहेत. भारतात सहापैकी एका बालकास अस्थमा असल्याचे आढळते. या वाढत्या प्रमाणाबाबत डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. लहान मुलांमध्ये दम्याचे प्रमाण सन 2008 मध्ये 5.5 टक्के इतके होते हे प्रमाण 2010 मध्ये 10 टक्क्यांपर्यंत पोहोचले. तर 2018 मध्ये हे प्रमाण 15 टक्क्याहून अधिक असल्याचे विविध अभ्यासातून निदर्शनास आले आहे.  

सर्वसामान्य लोकांच्या तुलनेत अस्थमाग्रस्त लोकांची श्‍वसननलिका अधिक संवेदनशील, प्रभावीत होणारी आणि नाजूक असते. यामुळे धूर आणि धूळ यांच्या संपर्कात येताच ती आंकुचन पावते आणि श्‍वसननलिकेला सूज येते. कफ बाहेर पडतो. परिणामी रुग्णाला धाप लागते. वारंवार खोकला येतो, छातीतून घरघर आवाज येतो. ही लक्षणे औषधे घेतल्यावर तात्पुरती बरी होतात आणि काही दिवसांनी परत होतात, पण प्रत्येकाच्याच बाबतीत तो अस्थमा आहे असे नाही, यातील काही बालके ही वाढत्या वयानुसार बरी होतात. योग्य उपचार घेतल्यास  90 टक्के हा आजार नियंत्रणात आणता येतो.