Mon, Apr 22, 2019 06:01होमपेज › Kolhapur › शिक्षक बदल्यांचे अधिकार सीईओंना

शिक्षक बदल्यांचे अधिकार सीईओंना

Published On: Jun 06 2018 1:42AM | Last Updated: Jun 05 2018 11:56PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या शिक्षक बदल्यांचा घोळ आता मिटणार आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या करण्यात आलेल्या ऑनलाईन बदल्यांमध्ये विस्थापित झालेले तसेच पती, पत्नी एकत्रीकरणासाठी बदल्यांचे अधिकार अखेर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. मात्र, शासनाकडून विस्थापितांची जी यादी येईल त्याच शिक्षकांच्या बदल्या करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. 

जिल्हा परिषदेत शिक्षकांची संख्या मोठी असल्याने दरवर्षी त्यांच्या बदल्यांचा विषय गाजत असतो. शिक्षक संघटना प्रभावी असल्यामुळे शिक्षकांच्या बदल्यांबाबत त्या अतिशय जागृत असतात. त्यामुळे शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या गेल्या काही वर्षांपासून झालेल्या नाहीत. गेल्यावर्षी  वर्षानुवर्षे दुर्गम, डोंगराळ भागात काम करणार्‍या शिक्षकांना सुगम भागात संधी मिळावी म्हणून शासनाने प्रयत्न केले. मात्र, संघटनांनी सुगम, आणि दुर्गम भागाबद्दल खूप घोळ घातला. शाळा सुरू झाल्या तरी तो गोंधळ सुरूच होता. त्यामुळे गेल्यावर्षी देखील बदल्या झाल्या नाहीत. यावर्षी शासनाने सर्व जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे जवळपास चार हजार शिक्षकांच्या बदल्या केल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल्या होण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. बदल्यांची यादी प्रसिद्ध न करता बदलीच्या ऑर्डर थेट शिक्षकांच्या हातात देण्यात येऊ लागल्या. त्यामुळे शिक्षकांना ऑर्डर पाहिल्याशिवाय बदलीचे ठिकाणच कळत नव्हते.

पूर्वी अगोदर यादी प्रसिद्ध करून नंतर ऑर्डर दिली जायची. हे अधिकार जिल्हा परिषद स्थानिक प्रशासनाला होते. बदली नको असलेल्या ठिकाणी झाली असेल तर संबंधित शिक्षक बदलीची ऑर्डर न स्वीकारता बदली रद्द करण्याच्या मागे लागत असे. त्यासाठी तो वाटेल ती ‘किंमत’ मोजण्यास तयार होई. यात काही जण आपले हात ओले करून घेत असत. असले प्रकार टाळण्यासाठीच शासनाने बदलीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली. यात अनेकांची सोय झाली. 

प्रथमच ही प्रक्रिया राबविण्यात आल्यामुळे यात काही त्रुटी राहणे स्वाभाविक आहे. त्या दूर करण्याचा प्रयत्न शासन करत आहेत. मात्र, शाळा सुरू होण्याचा दिवस जवळ येऊ लागला असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून तात्पुरती उपाययोजना म्हणून बदलीचे काही अधिकार मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना काही अटींवर देण्यात आले आहेत.