Tue, May 21, 2019 22:26होमपेज › Kolhapur › सहकार टिकवण्यासाठी प्रयत्न

सहकार टिकवण्यासाठी प्रयत्न

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

राज्याच्या आर्थिक विकासात सहकाराचे मोठे योगदान आहे. तो सहकार टिकवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहे, त्यातून परिवर्तन होत आहे, त्याला साथ द्या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले. 

दि. कागल को-ऑप बँकेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त बँकेचे राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप. बँक असे नामकरण करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खा. संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत कागल येथील गहिनीनाथनगर येथे हा सोहळा झाला. या बँकेने लोकांना छत्रछाया दिली, परिसरात आर्थिक समृद्धी दिली, असे गौरवोद‍्गारही यावेळी फडणवीस यांनी काढले. 

मुख्यमंत्री म्हणाले, शेतकर्‍यांच्या जीवनातील आर्थिक परिवर्तन हे सहकारामुळेच आहे. साखर कारखानदारी टिकली पाहिजे, दुसरीकडे शेतकर्‍यांनाही त्याच्या कष्टाचे उचित मूल्य मिळाले पाहिजे. यामुळे सरकारने एफआरपी देणे बंधनकारक केले. मात्र, काहींनी 

एफआरपीही देणे शक्य नाही, असे सांगितले. कारखानदारी अडचणीत असल्याचे सांगितले. त्यावर 2400 कोटी रुपयांचे ‘सॉफ्ट लोन’ कारखान्यांना दिले आणि साखर कारखानदारी जगवण्याचे काम सरकारने केले. 70-30 चा फॉर्म्युला स्वीकारायला सरकारने भाग पाडले आहे.

बँक ही केवळ नावापुरती नसते, संचालकांसाठी नसते. ती बँक त्या परिसराच्या विकासासाठी असते. संस्थात्मक कर्जाची मोठी व्यवस्था असते. संस्थात्मक कर्ज उभे केले की आर्थिक स्रोत उभे राहतात, उद्योगधंदे उभे राहतात, त्यातून समृद्धी येते, असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, समाजाच्या कल्याणासाठी, समाजाने एकत्र येऊन काम केले जाऊ शकते, हा सहकाराचा मूलमंत्र राजर्षी शाहूंनी दिला. तो मूलमंत्र जपत राजेंनी या बँकेची उभारणी केली. समाजासाठी काम करतात, त्यांच्याच संस्था मोठ्या होतात. हेच काम समरजित आज करत आहेत. या सोहळ्याला इतके लोक येतील याचा अंदाज नव्हता. महिलांचीही संख्या प्रचंड आहे, हे केवळ शाहूंवर, राजे घराण्यावर असलेले प्रेम आहे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राजे विक्रमसिंह घाटगे यांनी शाहूंचा वारसा चालवला. जनतेचा पालक कसा असतो, हे त्यांनी कामांतून दाखवून दिले. शाहू समूहाच्या निमित्ताने राजर्षी शाहूंचे जिवंत स्मारक उभे केले. राजेंचा राजकीय वारसाही आता तुम्हाला चालवला पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

त्यांच्या पोटात मळमळतंय

जिल्ह्यात भाजपचे दोनच लाभार्थी असे कोणीतरी म्हणाले, असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश घेऊन आपण संभाजीराजेंना फोन केला होता. शाहूंच्या घराण्याचा वारस संसदेत पाहिजे, म्हणून थेट राष्ट्रपतींच्या कोट्यातून संभाजीराजेंना खासदारकी दिली. ते मागायला आले नव्हते. पण, ज्यांनी आयुष्यभर शाहूंचे नाव घेऊन राजकारण केले, त्यांच्या नावावर मते मागितली, त्यांच्या घराण्यासाठी काही करण्याची वेळ आली, तेव्हा मात्र ते वरचढ होतील म्हणून, त्यांना सातत्याने डावलण्याचाच प्रयत्न केला. अशा लोकांच्या पोटात आता मळमळतंय, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावत, लाभार्थ्यावरून जी टीका झाली, त्याला आज जमलेला जनसमुदाय हेच उत्तर आहे, हीच जनता टीका करणार्‍यांना त्यांची जागा दाखवून देईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

दुकाने चालवण्यासाठी ‘त्यांनी’ गावोगावी विष पेरले : पालकमंत्री

राजेंनी आयुष्यभर रयतेचे भले करण्यासाठी काम केले. त्याच मार्गाने समरजित विकासाचे राजकारण करत आहेत. मात्र, ज्यांनी विकासाचे राज्य कधी केले नाही, ते भांबावून बेछूट आरोप करत आहेत. आपली राजकीय दुकानदारी चालावी म्हणून त्यांनी गावागावांत विष पेरले. स्वार्थासाठी एकत्र येणार मात्र गावागावांत, घराघरांत डोकी फुटणार. हे आता ओळखण्याची गरज आहे, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

कोणीतरी काल टीका केली; पण त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. निवडणुकीतच काय ते दिसेल. प्रत्येक वेळी ती सूज आहे, असे म्हणतात. मग तुम्हाला ती सूज का येत नाही, असा बोचरा सवाल करत पाटील यांनी, 127 गावांत भाजपचे सरपंच झाले. 863 सदस्य झाले. तुम्हाला चार ग्रामपंचायती तरी निवडून आणता आल्या का, अशा शब्दांत शिवसेनेवर नाव न घेता टीका केली.

महिला बचत गटांचा केवळ राजकारणासाठी वापर  : देशमुख

हे सरकार सहकार बुडवत आहे असे म्हणार्‍यांनी आपण किती संस्था बुडवल्या, किती लुटल्या, याचे आत्मचिंतन करावे, असे सांगत सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, राज्यात चार लाख महिला बचत गट आहेत, त्यांचा वापर यापूर्वी केवळ राजकारणासाठीच केला. अशा बचत गटांना उत्पादन वाढ, बाजारपेठा कौशल्य, विक्री आदींबाबत मार्गदर्शन करून त्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचा, परिसरातील सर्वसामान्यांचे अश्रू पुसण्याचे काम या बँकेच्या माध्यमातून विक्रमसिंह घाटगे यांनी केले. त्यांचे हे काम प्रेरणादायी आहे. आर्थिक संस्था कशा संपन्‍न होतील, यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. जे संचालक गैरप्रकार, अपहार करतील, त्यांना 10 वर्षे निवडणूक लढवता येणार नाही, असा कायदा सरकारने केला आहे. सहकारातील गैरप्रकारावर अंकुश ठेवण्याचे काम मुख्यमंत्री करत आहेत.

खा. संभाजीराजे म्हणाले, शाहूंचा सहकाराचा विचार राजेंनी प्रभावीपणे अंमलात आणला. त्यांनी उभा केलेला विकासाचा डोंगर समरजित यांना पेलेल का, असा प्रश्‍न होता. मात्र, गेल्या वर्षभरातील समरजित यांचे काम पाहता, हा विकासाचा डोंगर त्यांनी सहजपणे पेलला आहे. यामुळे हे काम अधिक वेगाने समरजित पुढे नेतील.

‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, आज बँकिंग क्षेत्रात गैरव्यवहार, अपहार, गैरप्रकार असे गोंधळाचे वातावरण असताना आमची बँक 100 वर्षे पूर्ण करत आहे, ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. केवळ ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचा विचार करून या बँकेचे कार्यक्षेत्र ग्रामीण भागातच विस्तारित केले जात आहे. ठिबक सिंचनासाठी सर्वाधिक कर्ज देणारी, सभासदांना सर्वाधिक लाभांश देणारी ही बँक आहे. युवकांसाठी छत्रपती शाहू युवक योजना सुरू करत असल्याची तसेच बँकेच्या दहा नव्या शाखा सुरू करत असल्याची घोषणाही यावेळी त्यांनी केली.

राजे फौंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रमांद्वारे राजे विक्रमसिंह घाटगे यांचे जिवंत स्मारक उभे करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते नामकरण फलकाचे अनावरण झाले. यावेळी राजमाता जिजाऊ महिला संघटनेच्या वतीने सुरू करण्यात येणार्‍या महिलांच्या कौशल्य विकास केंद्रांचेही उद्घाटन झाले. जलयुक्‍त शिवार योजनेत योगदान देणार्‍या जाखलेचे सरपंच सागर माने यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पंडित पाटील, अशोक सातुसे यांनी मनोगत व्यक्‍त केले. व्यासपीठावर प्रवीणसिंह घाटगे, आ. अमल महाडिक, सुरेश हाळवणकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक, श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे, सौ. नवोदिता घाटगे, तेजस्विनी भोसले, यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई आदींसह बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते. आभार बँकेचे चेअरमन एम. पी. पाटील यांनी मानले.