होमपेज › Kolhapur › कागदी वस्‍तुंचा 'कोल्‍हापुरी ब्रॅण्ड' (Video)

कागदी वस्‍तुंचा 'कोल्‍हापुरी ब्रॅण्ड' (Video)

Published On: Feb 22 2018 7:18PM | Last Updated: Feb 22 2018 7:18PMनिलेश पोतदार, पुढारी ऑनलाईन 

वाढत्या लोकसंख्येमुळे नैसर्गिक संसाधनांवर पडणारा ताण लक्षात घेऊन वस्‍तुंच्या पुनर्वापराची संकल्‍पना जगात रूढ होऊ लागली. यातूनच एखाद्या वस्‍तुचा पुनरर्वापर कसा करता येईल, प्लास्टिकच्या वस्‍तुंचा वापर कसा कमी करता येईल यावर जगभरात संशोधन सुरू झाले. या संकल्‍पनेवर आधारितच कोल्‍हापुरातील चिदंबर शिंदे यांनी रद्दी पेपरच्या माध्यमातून विविध गृहउपयोगी वस्‍तू साकारल्‍या आहेत.

प्लॅस्‍टिकला जगभरात पर्याय शोधले जात असताना, कोल्‍हापुरातील चिदंबर यांनी युट्‍युबवर पेनस्‍टॅन्डचा व्हिडिओ पाहिला. यातून प्रेरणा घेऊन त्‍यांनी रद्दी पेपरच्या माध्यमातून वस्‍तू साकारायला सुरूवात केली. शिंदे मुंबईत एका कंपनीत टेक्‍नीकल हेड म्‍हणून कार्यरत होते. पण, पर्यावरणप्रेम आणि त्‍यांच्यातील कलाकाराने त्‍यांना या वस्‍तू निर्मितीकडे वळायला भाग पाडले. 

शिंदे यांनी फ्लॉवर पॉट, हॅगिंग लॅम्‍प, डीएनए स्‍टाईल लॅम्‍प, स्‍क्‍वेअर लॅम्‍प, फ्रुट बास्केट, हंडी, घरगुती वापराच्या डस्‍टबीन, सिटिंग मॅट, टी कोस्‍टर, कुंकवाचा करंडा, पेनस्‍टॅन्ड यासारख्या ५० ते ६० प्रकारच्या गृहउपयोगी आणि शोभेच्या वस्‍तू साकारल्‍या आहेत. त्‍यांच्या या वस्‍तू त्‍यांनी कोल्‍हापुरातील स्‍वयंसिद्धाच्या माध्यमातून महाराष्‍ट्रभरात प्रदर्शनात मांडल्‍या आहेत. यासाठी शिंदे यांना स्‍वयंसिद्धाच्या कांचनताई यांच सहकार्य मिळाल्‍याचं ते आवर्जून सांगतात. शिंदे यांच्या वस्‍तू महाराष्‍ट्रासह अमेरिकेपर्यंत पोहचल्‍या आहेत.

यावरच न थांबता शिंदे यांनी रद्दीच्या कागदाचा आणि सुतळीचा वापर करून चपला देखील बनविल्‍या असून, याच्या पेटंटसाठी ते सध्या प्रयत्‍नशील आहेत. शिवाय त्‍यांनी कागदापासून यूज ॲन्ड थ्रो प्रकारचा पेन बनवला आहे. या पेनचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे हा पेन पुर्णपणे पर्यावरणपूरक असून, या पेनमध्ये झाडांच्या बीया घातलेल्‍या आहेत. ज्‍यामुळे पेन वापरून तो मातीत टाकल्‍यास त्‍याचा कागद मातीत कुजून त्‍यातील बीयामधून रोपटे तयार होते. 

 

 

शिंदे यांच्या या प्रयत्नाला आता केवळ पर्यावरणप्रेमीच नव्हे, तर प्रत्येक सामान्य माणसाने दाद देण्याची गरज आहे. त्यांच्या या कामाची दखल त्यांनी बनविलेल्या वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करूनच घेतली पाहिजे. या कागदाच्या वस्तू रोजच्या वापरात आल्या, तर नक्कीच प्लास्टिकला आपल्या आयुष्यातून हद्दपार करता येणे शक्य होणार आहे.