Sun, Jun 16, 2019 02:17होमपेज › Kolhapur › छत्रपती शाहू स्टेडियमची मशागत सुरू

छत्रपती शाहू स्टेडियमची मशागत सुरू

Published On: Jun 21 2018 1:36AM | Last Updated: Jun 21 2018 1:17AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

तब्बल सहा महिने सुरू असणार्‍या यंदाच्या फुटबॉल हंगामाची सांगता ‘चंद्रकांत चषक फुटबॉल महासंग्राम’ स्पर्धेने झाली. हंगाम संपताच मोठ्या पावसापूर्वी छत्रपती शाहू स्टेडियमच्या मशागत कामास प्रारंभ करण्यात आला आहे. माती टाकणे व तत्सम कामांची रेलचेल सध्या सुरू आहे. 

प्रतिवर्षी जानेवारी ते मे-जून असा सुमारे पाच-सहा महिन्यांचा कालावधी छत्रपती शाहू स्टेडियमवर कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामाचा थरार सुरू असतो. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्या (केएसए) मार्गदर्शन आणि संयोजनाखाली सॉकर रेफ्री असोसिएशन, सर्व तालीम संस्था, तरुण मंडळे व त्यांच्या फुटबॉल संघ, मनपा व पोलिस प्रशासन यांच्या सहयोगाने संपूर्ण हंगाम यशस्वी केला जातो. शेकडो संघ, हजारो खेळाडू आणि लाखो प्रेक्षकांच्या पाठबळामुळे हंगाम गाजतो. 

जीवाचे रान करून मैदान गाजविणार्‍या खेळाडूंसाठी केएसए तर्फे हिरवेगार मैदान सज्ज ठेवले जाते. यासाठी केएसएचे कर्मचारी आहोरात्र कष्ट करत असतात. मैदानावरील हिरवळ कडकडीत उन्हातही ‘जैसे थे’ ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. हिरवळीसाठी खत-पाण्यासह आवश्यक उपाय-योजना सातत्याने केल्या जातात. हंगाम संपताच मैदानाची इत्यंभूत मशागत केली जाते. यंदाचा हंगाम संपल्याने सध्या मैदानात हे मशागतीचे काम सुरू आहे. केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती व सर्व सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली मैदानाच्या विकासासह विविध खेळांच्या प्रगतीसाठीचे काम अखंड सुरू आहे.