Wed, Apr 24, 2019 11:43होमपेज › Kolhapur › सीपीआरमधील बोगस प्रमाणपत्र प्रकरणाची ‘जेजे’ मध्ये तपासणी

सीपीआरमधील बोगस प्रमाणपत्र प्रकरणाची ‘जेजे’ मध्ये तपासणी

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 23 2018 1:04AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

सीपीआरमध्ये बोगस प्रमाणपत्रे देणारी टोळी सक्रिय असून अनेकांना त्यांनी बोगस प्रमाणपत्रे अर्थपूर्ण घडामोडी करून दिली आहे. यामध्ये सीपीआरमधील काही कर्मचार्‍यांचा समावेश असून 25 अपंग कर्मचार्‍यांची मुंबई येथील ‘जेजे’ रुग्णालयात चौकशी व तपासणी सुरू झाली आहे. 21 ते 30 मेपर्यंत ही तपासणी सुरू राहणार आहे. बोगस प्रमाणपत्र घेणार्‍यावर आणि नंतर देणार्‍या डॉक्टरांवर देखील कारवाई केली जाणार आहे.

सह संचालक वैद्यकीय शिक्षणचे डॉ. तात्याराव लहाणे यांनी गेल्या आठवड्यात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट देऊन येथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यावेळी बोगस प्रमाणपत्र प्रकरणात दिरंगाई होत असल्याबाबत तक्रार केली होती. यावेळी डॉ. लहाणे यांनी पतित पावन संघटनेच्या शिष्ठमंडळाबरोबर चर्चा करून याप्रकरणी त्वरित चौकशी करू असे आश्‍वासन दिले होते. गेल्या चार दिवसांपासून बोगस प्रमाणपत्र प्रकरणाची गतीने चौकशी सुरू झाली आहे. येत्या आठवड्या भरात याचा सोक्षमोक्ष लागेल. 

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात व राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शासकीय सेवेत विविध विभागांत कर्मचारी काम करत आहेत. काही कर्मचारी सुद‍ृढ असूनही अंगत्वाचे बोगस प्रमाणपत्रे मिळवून शासकीय नोकरीसह पदोन्‍नती मिळविली आहे. याप्रकरणी पतित पावन संघटनेने आवाज उठविल्यानंतर प्रभारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी चौकशी समिती नेमली होती. मात्र, चौकशी समिती नेमूनसुद्धा कुठलीही ठोस कारवाई झाली नसल्यामुळे संघटनेने या विरोधात आंदोलन छेडले होते. पतित पावन संघटनेचे सुनील पाटील यांनी पुराव्यानिशी अधिष्ठातांच्या निर्दनास आणून दिल्यानंतर अपंग कर्मचार्‍यांची वैद्यकीय तपासणी मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात करण्याचा निर्णय घेतला होता.

यामध्ये दोषी आढळणार्‍या कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे आश्‍वासन डॉ. रामानंद यांनी संघटनेला दिले होते; पण मध्यतरी या प्रकरणाची चौकशी कासव गतीने सुरू होती. बोगस प्रमाणपत्रांची चौकशीला विलंबा का?  असा प्रश्‍न पतित पावन संघटनेने उपस्थित केला होता. यावर सह संचालक वैद्यकीय शिक्षणचे डॉ. लहाने यांनी गतीने चौकशी करून दोषीवर कारवाई करू असे आश्‍वासन दिले होते. या प्रकरणाची चौकशी 21 मेपासून सुरू झाली असून 30 मेपर्यंत सुरू राहणार आहे.