Sat, Nov 17, 2018 01:36होमपेज › Kolhapur › ‘समायोजन’च्या 13 शाळांची होणार फेरतपासणी 

‘समायोजन’च्या 13 शाळांची होणार फेरतपासणी 

Published On: Jun 25 2018 1:47AM | Last Updated: Jun 25 2018 1:02AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार समायोजित करावयाच्या 13 शाळांची फेरतपासणीचे वेळापत्रक जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने तयार केले आहे. त्यानुसार कृती समिती सदस्य व शिक्षण विभागातील अधिकारी दि. 27 व 28 जून दरम्यान शाळांची फेरतपासणी करणार आहेत. कमी पटाच्या शाळा बंद करणे, सरकारी शाळांचे कंपनीकरण या शासनाच्या अन्यायी निर्णयाविरोधात कोल्हापुरात शिक्षण वाचवा कृती समितीच्या वतीने जनआंदोलन उभारण्यात आले आहे. कृती समितीने वेगवेगळी आंदोलने करून शासन, प्रशासनाला जाग आणण्याचे प्रयत्न केले. शिक्षणमंत्री तावडे यांनी बिंदू चौकात येऊन चर्चेचे खुले आव्हान कृती समितीला दिले. यास कृती समितीने प्रतिआव्हान दिल्याने वातावरण तापले होते. 

दरम्यान, कोल्हापूर दौर्‍यावर आलेल्या शिक्षणमंत्र्यांनी दि. 9 जून रोजी प्रा. डॉ. एन. डी. पाटील, कृती समिती सदस्यांसमवेत विविध शैक्षणिक विषयांवर खुली चर्चा केली. जिल्ह्यात खासगी कंपन्यांच्या शाळांना परवानगी देणार नाही. शिक्षणावर खर्च वाढविणार, बंद केलेल्या शाळांची शिक्षण विभाग व कृती समितीतर्फे फेरतपासणी करण्यात येईल, असे महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले. कृती समितीस जनआंदोलन थांबविण्याचे आवाहन केले. त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दि. 21 जून रोजी शाळांच्या फेरतपासणीचा आदेश काढला असून तालुकानिहाय समितीची रचना केली आहे. जून महिन्याच्या अखेरीस प्रत्यक्ष शाळा व परिसराची पाहणी करून याचा शासनाला अहवाल सादर केला जाणार आहे. त्यानंतरच शासनाकडून याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.