Sat, Apr 20, 2019 10:04होमपेज › Kolhapur › भविष्याच्या नावाखाली अनेकांचे वर्तमान धुळीस!

भविष्याच्या नावाखाली अनेकांचे वर्तमान धुळीस!

Published On: Jul 03 2018 1:52AM | Last Updated: Jul 03 2018 12:36AMजरळी : अविनाश कुलकर्णी

तुमच्याजवळ भरपूर पैसा येतो, पण शिल्लक काहीच राहत नाही. तुम्ही नोकरीत चांगले आहात, पण तुमचे चांगले बघवत नाही. पत्नी प्रेमळ आहे. मुलांचे शिक्षण फार होणार आहे. तुम्ही ज्यांच्यावर विश्‍वास ठेवता तेच तुम्हाला फसवतात...  अशा प्रकारचे भविष्य आपण कोणालाही सांगितले तर ते पटतेच. कारण सुमारे 90 टक्के लोकांच्या जीवनात कमी-जास्त प्रमाणात हीच स्थिती असते. स्वतःला शिर्डीचे पंडित सांगणार्‍या एका भविष्यवेत्त्याने गडहिंग्लज तालुक्यातील दुंडगे, जरळी परिसरातील युवक, महिलांना चांगलाच गंडा घातला आहे. 

दोन-तीन दिवसांत सुमारे दोनशे ते पाचशे, हजारांपर्यंत पैसे बर्‍याच तरुण तसेच महिलांकडून ‘त्या’ ज्योतिषाने उकळले आहे; परंतु आपली झालेली फसगत सांगण्यास कोणीही समोर येण्यास धजावलेले नाही. गडहिंग्लज आणि परिसरातील अनेक बड्या नेत्यांची नावे सांगून आपली मगरमिठी घट्ट बसवून मगच भविष्य सांगायला सुरुवात होते. अंगात भगव्या-पिवळ्या रंगाचा शर्ट, काळी पँट, कपाळावर तीन-चार वेगवेगळ्या रंगाचे टिळे, लाघवी भाषा, भारदस्त आवाज आणि चेहर्‍यावरून सहज स्वभाव ओळखण्याचे कसब या अंगभूत कौशल्यामुळे कोणालाही सहज आपल्या जाळ्यात ओढण्याचे प्रकार घडत आहेत. 

रविवारी दिवसभर या तथाकथित भविष्यवेत्त्याचा वावर औरनाळ फाटा ते दुंडगे, जरळी, हेब्बाळ, क। नूल या परिसरात होता. कोणत्याही दुचाकीला हात करायचे आणि तो दुचाकीस्वार जिथपर्यंत जाणार तिथपर्यंत त्याच्याच गाडीवर बसून त्याचेच भविष्य सांगायचे. उतरताना माझ्याजवळील पुडी जवळ ठेवा कोणताच त्रास होणार नाही. सगळ्या अडचणी दूर होतील, अशी बतावणी करून दोनशे रुपयांची मागणी करायची हा फंडा वापरून अनेकांकडून पैसे उकळले आहेत. व्यक्तिमत्त्व, शरीरयष्टी प्रभावी असल्याने कोणीही सहज त्याच्या जाळ्यात सापडतो.एरवी दहा रुपयाची वस्तू पारखून घेणारा महिलावर्ग यांच्या लाघवी बोलण्याला भुलत आहे. त्यामुळे नागरिकांनीच आता सजग राहून अशांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.