Fri, Apr 26, 2019 15:32होमपेज › Kolhapur › तरुणीचा पाठलाग; भरचौकात धमकी

तरुणीचा पाठलाग; भरचौकात धमकी

Published On: Mar 06 2018 12:38AM | Last Updated: Mar 06 2018 12:29AMकोल्हापूर : प्रतिनिधी

उद्यमनगर येथील एका शोरूममध्ये काम करणार्‍या वीस वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तीन अनोळखी तरुणांनी भरचौकात धमकी दिल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला. संशयितांनी शोरूममध्ये घुसून अन्य कर्मचार्‍यांनाही धक्‍काबुक्‍की करून धमकावले. रात्री उशिरा तरुणांचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहे.

अनोळखी तरुणांविरुद्ध विनयभंग, पाठलाग करून धमकी दिल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजद्वारे नावे निष्पन्‍न होताच संबंधितांवर अटकेची कारवाई होईल, असे पोलिसांनी सांगितले.

राजारामपुरी येथील तरुणी उद्यमनगर येथील एका शोरूममध्ये कामाला आहे. सायंकाळी पाचच्या सुमाराला कंपनीतील अन्य एका महिला कर्मचार्‍यासमवेत रस्त्यावरून जात असताना अनोळखींनी दुचाकीवरून पाठलाग केला. तरुणांनी दोन ते तीनवेळा तरुणीभोवताली घिरट्या घातल्या.

अनपेक्षित घटनेमुळे भेदरलेल्या तरुणीने माघारी फिरून शोरूम कार्यालयाचा रस्ता धरला. संशयितांनी भरचौकात तिला अडविले. अश्‍लील हावभाव करीत पुन्हा भेटलीस तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.

जीवाच्या आकांताने युवती व महिला शोरूममध्ये पळत आल्या असता, संशयित पुन्हा तेथे आले. शोरूममध्ये घुसून अन्य कर्मचार्‍यांना धक्‍काबुक्‍की करीत त्यांनाही धमकावले. सायंकाळी युवतीने पोलिस ठाण्यात धाव घेऊन अनोळखी संशयितांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.