Wed, May 22, 2019 07:24होमपेज › Kolhapur › चरस, गांजा पार्टी : दोन डॉक्टरांसह तिघांना अटक

चरस, गांजा पार्टी : दोन डॉक्टरांसह तिघांना अटक

Published On: Aug 21 2018 1:36AM | Last Updated: Aug 21 2018 1:35AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शेंडापार्क येथील वैद्यकीय महाविद्यालयाजवळ सार्वजनिक ठिकाणी मोटारीत अंमली पदार्थांचे सेवन करणार्‍या दोन डॉक्टरांसह तिघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. रविवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. संशयितांकडून काळ्या रंगाच्या चरसच्या गोळ्या, गांज्याच्या पुड्या, मोटार असा लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.

डॉ. स्वप्निल सुनील मंडलिक (वय 30, रा. लक्षतीर्थ वसाहत), डॉ. भूषण चंद्रकांत मिठारी (31, उत्तरेश्‍वर पेठ), युवराज ऊर्फ अभी मोहन महाडिक (34, मंगळवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
चरस, गांजा पार्टीप्रकरणी दोन डॉक्टर जेरबंद झाल्याने शहरात सोमवारी दिवसभर चर्चेचा विषय बनला होता. अन्य संशयित युवराज ऊर्फ अभी महाडिक हा केबल  व्यावसायिक आहे. तिघांना अटक झाल्याने नातेवाईकांसह मित्रांनी सकाळपासूनच राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती.

अंमली तस्करीमागे मोठ्या रॅकेटची शक्यता

ओला चरस, गांजा पुड्या कोठून आणि केव्हा उपलब्ध झाल्या आहेत, याची संशयिताकडे चौकशी करण्यात येत आहे. तस्करीमागे मोठे रॅकेट कार्यरत असावे का, याचा शोध घेण्यात येत आहे, असे राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले.

मोटारकारमध्ये रंगली पार्टी

पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की, शेंडापार्क येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाजवळ मैदानावर दोन डॉक्टरांसह मित्रांची मोटारकारमध्ये गांजा, चरस पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिस उपनिरीक्षक अण्णासाहेब कांबळे, सिद्धेश्‍वर केदार, रजनीकांत कांबळे, राहुल मोहिते यांच्या पथकाने छापा टाकून डॉक्टरांसह तिघांना रंगेहाथ ताब्यात घेतले.

आणखी काही साथीदारांचा सहभाग?

मोटारीच्या झडतीत चरस कांड्या, गोळ्या, गांज्याच्या दोन पुड्या आढळून आल्या. अंमली साठ्यासह पोलिसांनी मोटारही हस्तगत केली. चरस, गांजा पार्टीत आणखी काही साथीदारांचा समावेश होता का? याचीही चौकशी करण्यात येत आहे. युवराज ऊर्फ अभी महाडिक हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे, असेही औदुंबर पाटील यांनी सागितले.