Mon, Jun 17, 2019 05:06होमपेज › Kolhapur › दिशा बदलून पंतप्रधानांना साथ द्या

दिशा बदलून पंतप्रधानांना साथ द्या

Published On: Jan 30 2018 1:51AM | Last Updated: Jan 30 2018 12:02AMकोल्हापूर : प्रतिनिधी

भीमा कृषी प्रदर्शन असो की, जिल्ह्यातील विकासकामे, या सर्वातच आपण उत्कृष्ट काम केले आहे. या कामांची दखल घेऊनच तुमचा संसदरत्न पुरस्काराने सन्मान झाला आहे. म्हणूनच येणार्‍या काळात दिशा बदला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात हात द्या, असे आवाहन आ. सुरेश हाळवणकर यांनी खा. धनंजय महाडिक यांना केले. भीमा कृषी प्रदर्शनाच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते.

मेरी वेदर ग्राऊंडवर चार दिवसांपासून भीमा कृषी व पशू प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचा समारोप आ. हाळवणकर यांच्या हस्ते सोमवारी झाला. यावेळी खा. धनंजय महाडिक, माजी आ. संजय घाटगे, वनश्री नाना महाडिक, ‘गोकुळ’चे चेअरमन विश्‍वास पाटील, सौ. अरुंधती महाडिक, ‘गोकुळ’ संचालक व इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण नरके, संचालक रवींद्र आपटे, रामराजे कुपेकर आदी उपस्थित होते.

आ. हाळवणकर म्हणाले, खा. महाडिक यांनी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. कोल्हापूर विमानतळाचा उडान योजनेत समावेश करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. सध्या जिल्ह्यात ऊसतोडणीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. म्हणून छोटे ऊसतोडणी यंत्र घेण्यासाठी खा. महाडिक यांनी केंद्रात प्रयत्न करावेत, असे सांगतानाच त्यांनी भाजपमध्ये यावे, अशी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आपली इच्छा असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

खा. महाडिक म्हणाले, कृषी प्रदर्शन भरवणे हे मोठे आव्हान आहे. सलग तीन महिने अहोरात्र या प्रदर्शनाची तयारी करावी लागते. देश-विदेशातील विविध कंपन्या, शेतकरी, पशुपालक यांच्याशी चर्चा करून त्यांची निवड करावी लागते. या कृषी प्रदर्शनासाठी कोटीभर रुपये खर्च केले जातात. यावर्षीच्या प्रदर्शनाला तब्बल 8 लाख शेतकर्‍यांनी भेट दिल्याची माहिती खा. महाडिक यांनी यावेळी दिली.
स्वागत व प्रास्ताविक ‘गोकुळ’चे संचालक रामराजे कुपेकर यांनी केले. यावेळी विविध स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला.

‘गोकुळ’च्या प्रतिमोर्चाने आवाज बंद

मध्यंतरी ‘गोकुळ’वर संकट आले होते. या प्रश्‍नात खा. महाडिक यांनी लक्ष घालून प्रतिमोर्चा काढला. तेव्हापासून ‘गोकुळ’ला विरोध करणार्‍यांचा आवाज बंद झाल्याचा टोला आ. हाळवणकर यांनी आ. सतेज पाटील यांना लगावला. तसेच आमच्याकडचे लोकप्रतिनिधी एकच विषय काढून आंदोलन करतात, असे सांगत खा. शेट्टी यांनाही टोला लगावला. यावेळी स्वाभिमानीच्या भगवान काटे यांचा चेहरा मात्र ओशाळल्यासारखा झाला.

पर्यायी पुलाचा प्रश्‍न लवकरच मार्गी

गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात विविध विकासकामे करण्यात आली असून, आणखीही कामे नियोजित आहेत. पुढील आठवड्यात बास्केट ब्रिज कामाची निविदा प्रसिद्ध होणार आहे. शिवाजी पुलाला पर्यायी पुलाच्या कामासाठी अर्कियॉलॉजिकल कायद्यातील दुरुस्तीसाठीही प्रयत्न सुरू आहेत. हा प्रश्‍नही लवकरच मार्गी लागेल, असा विश्‍वास खा. महाडिक यांनी व्यक्‍त केला.