Wed, May 22, 2019 23:05होमपेज › Kolhapur › हिवाळी अधिवेशन : पुरातत्त्व कायद्यात बदल

हिवाळी अधिवेशन : पुरातत्त्व कायद्यात बदल

Published On: Dec 16 2017 2:06AM | Last Updated: Dec 16 2017 2:41AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

पुरातत्त्व खात्याच्या कायद्यात या हिवाळी अधिवेशनात बदल करण्याबाबतचे विधेयक लोकसभेत सादर झाल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकात दिली आहे. प्राचिन स्मारक-पुरातत्त्व स्थळ व अवशेष संशोधन असे हे विधेयक असून त्यामुळे पर्यायी शिवाजी पुलाचे रखडलेले काम मार्गी लागेल. 

महाड येथील सावित्री नदीवरील जुना पूल कोसळल्यानंतर पंचगंगेवरील जुन्या शिवाजी पुलाचीही अशीच अवस्था असल्याकडे लक्ष वेधले होते आणि त्यानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी खास बैठक आयोजित केली होती, असे पत्रकात स्पष्ट केले आहे. केंद्रीय पुरातत्त्व खात्याचे मंत्री महेश शर्मा, राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यावरण मंत्री सचिन परब, पुरातत्त्व खात्याचे महासंचालक नवनीत सोहनी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता आर. के. बामणे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि आपण स्वतः या बैठकीला होतो.

व्यापक जनहितासाठी पर्यायी शिवाजी पुलाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश ना. गडकरी यांनी केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अधिकार्‍यांना दिले होते. त्यानंतर केंद्रीय पुरातत्त्व खात्याचे मंत्री शर्मा यांनी मे मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला आणि त्यास मंजुरीही मिळाली.

लोकसभेत सादर झालेल्या नव्या विधेयकानुसार पुरातत्त्व खात्याच्या 1858 च्या अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्ये सुधारणा करून संरक्षित क्षेत्रापासून 100 मीटर परिसरात बांधकाम न करण्याची अट शिथिल करण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार परवानगी देण्याची प्रक्रियाही तयार करण्यात आली असून, नॅशनल मॉन्युमेंट अ‍ॅथॉरिटीच्या माध्यमातून कालबद्धरितीने टप्पे पार पडणार आहेत.

या विधेयकामुळे शिवाजी पुलाबरोबरच पन्हाळा येथील प्रस्तावित लाईट अँड साऊंडसह इतर कामे मार्गी लागतील, असे स्पष्ट करून या सर्व प्रक्रियेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचेही सहकार्य लाभल्याचे पत्रकात म्हटले आहे.