Tue, Jun 02, 2020 19:35होमपेज › Kolhapur › मनपात बदलणार सत्तेची समीकरणे?

मनपात बदलणार सत्तेची समीकरणे?

Published On: Aug 30 2018 1:18AM | Last Updated: Aug 30 2018 12:10AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने 19 नगरसेवक अपात्र ठरले आहेत. फक्‍त त्याबाबतचे औपचारिक आदेश बाकी आहेत. त्यामुळे संबंधित नगरसेवकांना आता महापालिकेच्या कोणत्याही कामकाजात भाग घेता येणार नाही. यात सत्ताधारी काँग्रेसचे 7 व राष्ट्रवादीचे 4, विरोधी भाजपचे 4 व ताराराणी आघाडीचे 3 आणि शिवसेनेच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. यातील अनेक जण स्थायी समितीसह इतर समितींत आहेत. परिणामी, महापालिकेतील सत्तेची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. 

स्थायी समिती सभेत सत्ताधारी काँग्रेस 5, राष्ट्रवादी 3, तर विरोधी ताराराणी आघाडीचे 4, भाजप 3 आणि शिवसेनेचा 1 नगरसेवक आहे. काँग्रेसच्या 5 पैकी डॉ. संदीप नेजदार, श्रीमती दीपा मगदूम या दोघांचा अपात्र ठरलेल्यांत समावेश आहे. तर राष्ट्रवादीचे अफजल पिरजादे हेही आहेत. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्थायीतील संख्याबळ 8 वरून 5 इतके झाले आहे. तर शिवसेनेच्या प्रतिज्ञा उत्तुरे यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा असल्याने 6 नगरसेवक होतात. विरोधी ताराराणी आघाडीच्या फक्‍त सौ. सविता घोरपडे यांचाच 19 नगरसेवकांत समावेश आहे. त्यामुळे भाजप-ताराराणी आघाडीचेही संख्याबळ 6 झाले आहे. त्यातच काही महिन्यांपूर्वी झालेल्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीला सुरुंग लावत सभापतिपद खेचून घेतले आहे. त्यामुळे महापालिकेत विरोधी असूनही स्थायी समितीत भाजपचा सभापती आहे. 

परिवहन समितीत काँग्रेसचे 2 नगरसेवक असून, राष्ट्रवादी, भाजप, ताराराणी आघाडी व शिवसेनेचे प्रत्येकी एक नगरसेवक आहेत. स्थायी समिती सभापती या समितीत पदसिद्ध सदस्य असतात. या समितीमधील राष्ट्रवादीचे सचिन पाटील व भाजपचे संतोष गायकवाड हे अपात्र ठरलेल्या नगरसेवकांच्या यादीत आहेत. त्यामुळे या समितीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. 

महिला व बालकल्याण समितीतही हीच स्थिती असणार आहे. त्याबरोबरच महापालिकेच्या गांधी मैदान, छत्रपती शिवाजी मार्केट, राजारामपुरी व ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयाच्या प्रभाग समितीमधील सत्तेची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. कारण, परिवहन समिती, महिला व बालकल्याण समिती आणि प्रभाग समितीत सत्ताधारी व विरोधकांत एक-दोन मतांचा फरक आहे.

‘यादी वेळाने पाठविल्याप्रकरणी चौकशी करा’
महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल 2 नोव्हेंबरला लागल्यानंतर महापालिका प्रशासनाने एस.सी. व ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या नगरसेवकांची यादी महिनाभर उशिरा पाठविली असल्याची चर्चा आहे. त्याची चौकशी करावी, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्ष भाजप-ताराराणी आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीधर पाटणकर यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. यात स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, विरोधी पक्षनेते विलास वास्कर, ताराराणी आघाडी गटनेते सत्यजित कदम यांच्यासह इतरांचा समावेश होता.