Fri, Mar 22, 2019 05:32
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › एफ.आर.पी.चे सूत्रच बदलण्याचा डाव!

एफ.आर.पी.चे सूत्रच बदलण्याचा डाव!

Published On: Jul 20 2018 1:11AM | Last Updated: Jul 20 2018 12:27AMसंपलेल्या हंगामात घटलेल्या साखर दराचे कारण पुढे करीत कारखानदारांनी आश्‍वासित दराला बगल देत एफ.आर.पी. लाच गंडा घातला. अजूनही काही कारखान्यांची एफ.आर.पी. थकीत आहे. त्यानंतर कृषिमूल्य आयोगाने एफ.आर.पी. फुगवली, असा आरोप करीत एफ.आर.पी.चे मूल्य निश्‍चित करण्याची पद्धत बदलण्याची मागणी सुरू  केली. त्याला बळी पडत केंद्र सरकारने एफ.आर.पी. चा पायाभूत उतारा पुन्हा अर्धा टक्क्यांनी घटवला. म्हणायचे प्रतिटन 200 रुपयांची वाढ दिली; पण प्रत्यक्षात प्रतिटन 13 टक्के उतार्‍याला केवळ प्रतिटन 87 रुपये वाढ दिली आहे. गोड बोलून ऊस उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.  2005 मध्ये सुरू झालेल्या या षड्यंत्राचा आढावा घेणारी मालिका....

कुडित्रे : प्रा.एम. टी. शेलार

सरकार आणि कारखानदार यांनी मिलीभगत करीत प्रतिकूल वाटणारे एफ.आर.पी.चे (पूर्वाश्रमीची एस.एम.पी.) सूत्र बदल करून अनुकूल करून घेतले. पण, आता अंगलट आल्याने एफ.आर.पी.चा दर अवास्तव असल्याची ओरड करीत भारतीय साखर कारखानदारांची संघटना असलेल्या  इस्माने एफ.आर.पी. निश्‍चित करण्याची पद्धतच बदलण्याची मागणी केली. आता शासनाने पायाभूत उतारा अर्धा टक्क्यांनी घटवून कारखानदारांची पाठराखणच केली आहे. ‘चोराच्या उलट्या.. ’ या नात्याने ऊस उत्पादक संतप्त झाले आहेत.

अन्यायाची सुरुवात 2005 पासून

2005-06 च्या हंगामापासून तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी एफ.आर.पी.च्या सूत्रात महत्त्वाचे तीन घातक बदल करून ऊस उत्पादकांच्या मार्गात काटे पसरले. 1980-81 पासून चालत आलेल्या सूत्रास तिलांजली दिली. यातील पहिला बदल म्हणजे एफ.आर.पी. (पूर्वी एस.एम.पी.) काढताना त्या कारखान्याचा गेल्या हंगामातील अ‍ॅव्हरेज पीक रिकव्हरी पाया मानला जात असे . तो पाया बदलून केंद्र सरकारने गेल्या हंगामातील  अ‍ॅव्हरेज रिकव्हरी पाया मारण्याचे सूत्र स्वीकारले.  

 प्रतिटन 350 रुपयांनी एफ.आर.पी. मारली!

अ‍ॅव्हरेज पीक रिकव्हरी  

म्हणजे कारखान्यांच्या गळीत हंगामातील  जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांच्या उतार्‍यांची सरासरी, तर अ‍ॅव्हरेज रिकव्हरी म्हणजे कारखान्याच्या संपूर्ण गळीत हंगामाची सरासरी रिकव्हरी. 
जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यात थंडीमुळे साखर उतारा अत्यंत चांगला असतो. त्यामुळे अ‍ॅव्हरेज रिकव्हरीपेक्षा अ‍ॅव्हरेज पीक रिकव्हरी ही एक ते दीड टक्का जास्त असते. हा पायाच बदलल्याने ऊस उत्पादकांची एफ.आर.पी. दीड टक्क्यांनी घटली.  चालू दराने म्हणजे 2017-18च्या हंगामात प्रतिटन 402 रुपयांनी ऊस दर घटला. कृषिमूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार पुढील हंगामात तो दर प्रतिटन 412 रुपयांनी घटणार आहे.