Sat, Jun 06, 2020 22:46होमपेज › Kolhapur › बांधकाम परवानगीत बदल

बांधकाम परवानगीत बदल

Published On: Dec 21 2017 1:53AM | Last Updated: Dec 20 2017 11:26PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : सतीश सरीकर

कोल्हापूर महापालिकेच्या वतीने जानेवारीपासून बांधकाम परवानगीत बदल करण्यात येणार आहेत. महापालिका कार्यक्षेत्रात आर्किटेक्ट, सर्वेक्षक व इंजिनिअर यांना बांधकाम परवानगीचे अधिकार देण्यात येणार आहेत. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी-कर्मचार्‍यांच्या खाबूगिरीला लगाम बसणार आहे. मात्र, नागरिकांना आर्किटेक्ट किंवा थेट महापालिकेतून प्रचलित पद्धतीने असे दोन पर्याय बांधकाम परवानगीसाठी असणार आहेत. 

दोन हजार फुटांपर्यंतच्या बांधकामाचे अधिकार आर्किटेक्ट, सर्वेक्षक व इंजिनिअर यांना देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. बांधकाम परवाने देण्यासंदर्भात इमारत परवानगी मंजुरी प्रक्रिया सुलभतेने व जलदगतीने होण्यासाठी जोखीम आधारित (रिस्क बेस्ड) इमारत परवानगी मंजुरी प्रक्रिया राबविण्याचे धोरण ठरविले आहे. विविध प्रकारच्या घटकांच्या आधारे निश्‍चित होणार्‍या जोखीम असलेल्या प्रकरणांत परवानाधारक आर्किटेक्ट, सर्वेक्षक, इंजिनिअर यांना सशर्त मंजुरीचे अधिकार देण्यासाठी फेरबदल केला आहे. त्यानुसार दीड हजार ते दोन हजार चौ. फुटांपर्यंतच्या प्लॉटवर बांधकाम करण्यासाठी महापालिकेच्या परवानगीची गरज नाही. बांधकाम परवानगी आर्किटेक्ट, सर्वेक्षक व इंजिनिअर यांना स्वतःच्या जोखमीवर देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र व भोगवटापत्र देण्याचे अधिकारही आर्किटेक्टना दिले आहेत. त्यामुळे लहान प्लॉटधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

...या बांधकामासाठी परवानगीची गरज नाही

1 हजार 614 चौरस फूट क्षेत्रफळाच्या प्लॉटवर पार्किंग अधिक तळमजला आणि त्यावर एक मजल्यापर्यंत 
2 हजार 128 चौ.फू.पर्यंतच्या प्लॉटवर पार्किंग अधिक तळमजला आणि त्यावर दोन मजले

...अशी असेल प्रक्रिया

आर्किटेक्ट बांधकामाचा नकाशा तयार करणार  
महापालिकेकडे मंजुरीसाठी नकाशा सादर 
जे.ई.ने 7 दिवसांत बांधकाम परवानगी प्रमाणपत्र देणे 
बांधकामासंदर्भातील सर्व शुल्क भरणे  
प्लींथ चेकिंग आर्किटेक्टच करणार  
बांधकाम झाल्यावर दहा दिवसांत भोगवटा प्रमाणपत्र