Wed, Jun 26, 2019 18:28होमपेज › Kolhapur › हा घ्या २०२३ कोटींच्या विकासकामांचा हिशेब..!

हा घ्या २०२३ कोटींच्या विकासकामांचा हिशेब..!

Published On: Apr 18 2018 1:41AM | Last Updated: Apr 18 2018 1:15AMकोल्हापूर : प्रतिनिधी  

जिल्ह्यातील सर्व उपेक्षित, वंचित, समाजातील दुर्लक्षित घटकांसह सर्वांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी चार वर्षांत सुमारे 2023 कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे. 500 कोटी रुपयांचा विकास निधी आणून दाखवा; हत्तीवरून मिरवणूक काढतो, अशी वल्गना करणार्‍या या नेत्याला हा विकास निधी दिसत नाही का? असा पलटवार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. 

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डोळ्यांवर गांधारीची पट्टी बांधल्यानेच चुकीचे आरोप करण्याचे काम सुरू आहे. केवळ शहर विकास हे धोरण न ठेवता जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच ध्येय ठेवून वाटचाल करत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारी व स्वत:च्या तुंबड्या भरणार्‍या राजकारणाला जनता वैतागली होती, त्यामुळेच राज्यात भाजपचे सरकार आले. महापालिकेत सत्ता असणार्‍यांनी थेट पाईपलाईनसह ज्या काही योजना आणल्या त्यात  केवळ ढपला पाडण्याचे कामच केले. 

जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थानिक नेत्याला पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करून दाखवले. विधानसभेच्या निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे कोल्हापूरच्या जनतेवर लादलेले टोलरूपी भूत गाडले. टोल पंचगंगेत बुडवू, अशी वल्गना केली आणि दुसरीकडे टोलची पावती फाडून जनतेचा घोर अपमान केला. टोल बुडवण्यासाठी भाषा करून जनतेच्या डोळ्यात धूळफेकच केली. त्यामुळेच विरोधकांच्या छातीत धडकी भरली, असे पत्रकात म्हटले आहे. 

विरोधकांकडे लक्ष न देता, लोकांचा विकास केंद्रस्थानी ठेवून विकासाचे नवे पर्व जिल्ह्यात सुरू केले. जिल्ह्याचा विकास न झाल्याने सर्व क्षेत्रांत नाराजी होती. ही नाराजी दूर करण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी विविध उपक्रम राबवून त्या माध्यमातून विकासाची गंगा जिल्ह्यात सुरू केली. 

पर्यटनाच्या माध्यमातून विकासाची नवी कवाडे खुली केली. ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ हे विकासाची नवी गंगा आणणारेच पाऊल आहे. यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक विकास होण्यास मदत होणार आहे. सांस्कृतिक, सहकार, शेती, औद्योगिक, ऐतिहासिक, सामाजिक क्षेत्रात असा चौफेर विकास त्यांनी केला. जिल्ह्याचा विकास पाहून राज्यासह देशाचे लक्ष कोल्हापूरकडे वेधले गेले, असेही पत्रकात स्पष्ट केले आहे. 

 

Tags ; kolhapur, kolhapur news, Chandrakant Patil, development fund,