Mon, May 20, 2019 08:12होमपेज › Kolhapur › दुरावलेल्या मित्रांच्या एकीने युतीचे संकेत

दुरावलेल्या मित्रांच्या एकीने युतीचे संकेत

Published On: May 10 2018 1:35AM | Last Updated: May 10 2018 12:32AMकोल्हापूर : विठ्ठल पाटील

राजकीय पटलावर एकमेकांना पाण्यात पाहणार्‍या पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या समझोत्यातून कोल्हापुरात युतीचे संकेत निर्माण झाले आहेत. एकेकाळचे कट्टर मित्र आणि नंतर राजकीय हाडवैरी झालेल्या पाटील व क्षीरसागर यांच्यातील समझोत्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनाही दिलासा लाभला आहेच, पण त्याचबरोबर कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळून यातून भाजप आणि शिवसेना कोल्हापुरात जवळ येतील, अशी आशा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाल्या आहेत.

आमदार क्षीरसागर यांच्या पत्नी सौ. वैशाली क्षीरसागर प्रत्येक वर्षाला भगिनी महोत्सव आयोजित करतात. यंदाही हा महोत्सव मोठ्या धूमधडाक्यात पार पडला. त्याचा सांगता समारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. ना. पाटील व आ. क्षीरसागर एका व्यासपीठावर येताच राजकीय वर्तुळातून आश्‍चर्य व्यक्‍त केले गेले. गेल्या दोन वर्षांपासून या दोघांमध्ये टोकाचा राजकीय संघर्ष निर्माण झाला होता. एकमेकांनी केलेली टीका दोघांच्याही कार्यकर्त्यांना अस्वस्थ करून गेली. युती आणि हिंदुत्वाचा मुद्दा भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते विरसत चाललेत की काय अशी परिस्थिती कोल्हापुरात निर्माण झाली होती. त्याला आता थोडाफार ब्रेक मिळेल, अशी कार्यकर्त्यांतून अपेक्षा  व्यक्‍त केली जात आहे.

शिवसेनेच्या ग्रामीण नेत्यांच्या सहकार्याने कोल्हापूर जिल्हा परिषदेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सत्ता स्थापन केली. त्याची पुनरावृत्ती कोल्हापूर महापालिकेत मात्र ना. पाटील यांना करता आली नाही. आमदार क्षीरसागर यांच्यामुळेच भाजपला महापालिकेत सत्ता स्थापन करता आली नसल्याचे राजकीय जाणकारांनी बोलूनही दाखविले होते. भाजपबरोबर युती करण्याऐवजी सेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली. सेनेच्या पाठिंब्यामुळे दोन्ही काँग्रेसला महापालिकेत सत्ता स्थापन करणे सोपे झाले. या राजकीय घडामोडी युती धर्माच्या विरोधात होत्या. केंद्रात, राज्यात आणि जिल्हा परिषदेतही भाजपबरोबर असणारी सेना कोल्हापूर शहरात मात्र काँग्रेसबरोबर राहिल्याने त्याचा वेगळा संदेश राज्यस्तरावर गेला.

केंद्रात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता असताना चंद्रकांत पाटील आणि राजेश क्षीरसागर कोल्हापुरात एकत्र होते. कोणतेही आंदोलन असो अथवा सामाजिक प्रश्‍न असो दोघांनी एकत्र येऊन सोडविला होता. गणेशोत्सव काळात पोलिसांबरोबर झालेल्या वादानंतर आ. क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यावेळी कोल्हापुरात मोठे आंदोलन झाले. त्याचे नेतृत्व चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावेळी आमदार असलेल्या पाटील यांनी क्षीरसागर यांना पाठिंबा देत सेना-भाजप एकीचे दर्शन घडविण्याबरोबरच कार्यकर्त्यांना साथ दिली होती.

काँग्रेसची सत्ता जाऊन 2014 ला युतीची सत्ता आल्यानंतर मात्र ना. पाटील आणि आ. क्षीरसागर यांच्यात अंतर पडत गेले. पहिल्या टप्प्यातच ना. पाटील कॅबिनेट मंत्री झाले. यादीत नाव असताना अखेरच्या क्षणी आ. क्षीरसागर यांना सेनेकडून वगळले गेले. त्यातून सेनेचे कार्यकर्ते नाराज झाले. मंत्री या नात्याने ना. पाटील यांनी कामाचा धडाका सुरू केला. आ. क्षीरसागर यांच्यावर मर्यादा आल्या. त्यातून दोघात हळूहळू श्रेष्ठत्वाचा मुद्दा उपस्थित झाला आणि हे दोघे दुरावले गेले. 2017 च्या गणेशोत्सवात तर डॉल्बीवरून या दोन नेत्यात मोठा संघर्ष निर्माण झाला. ना. पाटील यांनी डॉल्बीला विरोध तर आ. क्षीरसागर यांनी समर्थन दर्शविले. त्यातूनही दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये ठिणगी पडली.

पाटील व क्षीरसागर यांच्यातील दुराव्यामुळे कोल्हापूर शहरातील भाजप आणि सेनेचे कार्यकर्ते अस्वस्थ होते. हिंदुत्वाच्या मुद्यावरून एकत्र नांदणार्‍या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना दुरावा सहन होत नव्हता. अखेर त्यांच्या आनंदाचा क्षण गेल्या आठवड्यात झालेल्या भगिनी महोत्सवाच्या निमित्ताने द्विगुणीत झाला. महोत्सवाच्या सांगता समारंभाला उपस्थित असणार्‍या ना. पाटील यांनी क्षीरसागर यांच्याबरोबरची मैत्री कायम असल्याचे सांगितले. 

महापालिकेची सत्ता युतीकडे?

राजकारणात काही प्रसंग घडतात, पण ते विसरूनही जाणे आवश्यक असते, असा वडिलकीचा सल्‍ला देत ना. पाटील यांंनी सेनेच्या कार्यकर्त्यांना दिलासा दिला.  त्यामुळेच ना. पाटील आणि आ. क्षीरसागर यांच्यातील हा समझोता भविष्यात कोल्हापुरातील युती अधिक घट्ट करण्यास उपयोगी पडेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. या समझोत्यातून कोल्हापूर महापालिकेची सत्ता युतीकडे येईल, असेही मानले जात आहे.