Sat, Mar 23, 2019 18:40होमपेज › Kolhapur › ‘चांदोली’चे पाणी सांडव्यापर्यंत

‘चांदोली’चे पाणी सांडव्यापर्यंत

Published On: Jul 15 2018 1:29AM | Last Updated: Jul 14 2018 11:12PMवारणावती/वारणानगर : वार्ताहर

चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान, सलग तिसर्‍या दिवशीही अतिवृष्टी झाली आहे. गेल्या चोवीस  तासांत 94 मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढून पाणी सांडवा पातळीपर्यंत पोहोचले आहे. सध्या धरणातील सांडवा  पातळी 618.60 मीटर आहे. धरणात 26.81 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण 77.83 टक्के भरले आहे. दरम्यान, धरण परिसरात अतिवृष्टी सुरूच आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास येत्या 24 तासांत धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडावे लागणार आहे. विसर्ग उद्या, रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ होणार असल्याने, नदीकाठच्या लोकांनी खबरदारी घ्यावी, असा इशारा वारणा पाटबंधारे शाखेचे शाखाधिकारी प्रदीप कदम यांनी दिला आहे.