Wed, Jul 24, 2019 12:52होमपेज › Kolhapur › लग्‍नमंडपासमोर टेम्पोने  चिरडले; दोघांचा मृत्यू

लग्‍नमंडपासमोर टेम्पोने  चिरडले; दोघांचा मृत्यू

Published On: Apr 20 2018 6:44PM | Last Updated: Apr 20 2018 6:44PMचंदगड : प्रतिनिधी

उतारावरून भरधाव वेगाने येणार्‍या टेम्पोने लग्‍न मंडपानजीकच दोघांना चिरडले. यामध्ये ढेकोळी बुद्रुक येथील चाळोबा लक्ष्मण रेंबूळकर (वय 39) व जोतिबा भरमू पवार (42) हे जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर गर्दीचा फायदा घेत चालकाने पलायन केले. दरम्यान, संतप्त जमावाने टेम्पो पेटवण्याचा प्रयत्न केला.

देवरवाडी येथे रेंबूळकर व पवार हे ढेकोळीहून जंगमहट्टी येथील नातेवाईकांच्या लग्‍नाला आले होते. लग्‍नाच्या अक्षता पडल्यानंतर या दोघांनी वर्‍हाडी मंडळींसमवेत भोजन केले. वधू-वरांना भेट देण्यासाठी नजीक असलेल्या आणि रस्त्यापलीकडे असणार्‍या एका स्टेशनरी दुकानात कागदी लखोटा खरेदी करण्यासाठी ते गेले होते. लग्‍न मंडपाकडे दुचाकीवरून (एम एस 09 ईडी 8165) येत असताना उतारावरुन भरधाव वेगाने आलेल्या पेव्हरब्लॉकने भरलेल्या अवजड टेम्पोने (के ए 05 एबी 2253) पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये दोघेही दहा फूट फरफरटत गेले.

धडक इतकी जोराची होती की, दोघांच्याही डोके व शरीराचा चेंदामेंदा झाला होता. लग्‍नमंडपासमोर झालेल्या अचानक या दुर्दैवी घटनेने मंगलमय वातावरणावर अवघी शोककळा पसरली. रेंबूळकर यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. तर पवार यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, दोन मुले व मुलगी असा परिवार आहे.