Fri, Apr 26, 2019 03:46होमपेज › Kolhapur › तिलारी घाटात कार कोसळून पाच ठार!

तिलारी घाटात कार कोसळून पाच ठार!

Published On: Jul 08 2018 6:51PM | Last Updated: Jul 08 2018 10:32PMचंदगड : प्रतिनिधी

तिलारीनगर-कोदाळी गावानजीक असलेल्या सूर्यास्त दर्शन पॉईंट म्हणून ओळखल्या जाणार्‍या ठिकाणाहून कार दरीत कोसळून बेळगावच्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

बेळगाव येथील युवक चंदगड तालुक्यातील पर्यटनस्थळ पाहण्यासाठी आणि वर्षा सहलीचा आनंद लुटण्यासाठी आले होते. शेवाळावरून गाडीचे ब्रेक लागले नसल्याने थेट दरीत कोसळली. यामध्ये मोहन लक्ष्मण रेडेकर (वय 40, रा. बाळेकुंद्री ता. जि. बेळगाव), पकंज ऊर्फ ज्योतिर्लिंग संपत किल्लेदार (3, रा. शिवाजीनगर, बेळगाव), किसन मुकुंद गावडे (29) व नागेंद्र सिंद्राय बाबुगावडे (19  रा. अष्टे, ता. जि. बेळगाव), यल्लापा एन. पाटील (45, रा. बोकनूर, ता. जि. बेळगाव) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. प्रवीण प्रकाश गाडेकर व दयानंद दत्ता बडसकर यांनी अपघाताची माहिती चंदगड पोलिसांना  दिली. 

बेळगाव भागातील हे युवक वर्षा सहलीसाठी चंदगड तालुक्यात आले होते. प्रारंभी त्यांनी स्वप्नवेल पॉईंट येथे जाऊन सहलीचा आनंद लुटला होता. त्यानंतर तिलारीनगर येथे जेवण आटोपून पाच वाजण्याच्या सुमारास कोदाळी येथील सूर्यास्त पॉईंटवर पोहोचले. यामधील पकंज किल्लेकर हा गाडी चालवत होता. दरी जवळ आल्यानंतर शेवाळावरुन गाडीचे ब्रेक लागले नसल्याने गाडी थेट दरीत कोसळली. दरीत कोसळताना गाडीचे दरवाजे निखळले व यामधील किल्लेकर व पाटील यांनी दरीत उडी मारली. या दोघांचा दगडावर आपटून मृत्यू झाला.

तर रेडेकर गावडे आणि बाबुगावडे हे गाडीतच अडकले होते. सुमारे अडीचशे फुटावरुन कार कोसळल्याने गाडीचा चेंदामेंदा झाला होता. प्रचंड पाऊस आणि धुके असल्याने दरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना व कोदाळी येथील ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागली. काहींचे मृतदेह कोदाळीच्या ग्रामस्थांनी खांद्यावरुन वर आणले. तर झाडा झुडूपात असणार्‍या मृतदेहांना आणणे मुस्कील झाले होते. गाडीतील तिघेजण बराच वेळ अडकून पडले होते. पहारीच्या सहाय्याने गाडीचे पत्रे वाकवून मृतदेह बाहेर काढण्यास यश आले. यामध्ये पोलिस निरीक्षक श्रीपाद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कोदाळीचे सरपंच अकुंश गावडे, मायकल लोबो, रमेश अनगळ, प्रवीण गाडेकर, दयानंद बडसकर यांनी शर्थीचे प्रयत्न केले. 

2015 च्या घटनेची आठवण

दि. 15 ऑक्टोेबर 2015 रोजी हेरे प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका याच दरीत त्याच ठिकाणी कोसळली होती. यामध्ये शामराव संकपाळ, कविता देसाई, अर्जुन पाटील, सुशीला मंडलिक हे चार जण जागीच ठार झाले होते. तर उपचार सुरू असताना दुसर्‍या दिवशी एकाचा मृत्यू झाला होता.